

पुणे: कोथरूड येथील गोसावी वस्ती झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सरकारी जागेसह महापालिकेच्या मोकळ्या जागेवरही झोपडपट्टी दाखविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सरकारी जागांवर झोपडपट्टी नसतानाही गोसावी वस्तीमधील झोपड्यांची संख्या दुप्पट फुगवून 'एसआरए'च्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून या घोटाळ्याला खतपाणी घातल्याचा आरोप केला जात आहे.
कोथरूड येथील सर्वे नंबर १५९ व १६० मधील जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा प्रस्ताव 'एसआरए प्राधिकरणा'ने मंजूर केला आहे. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे आता उघड झाले आहे. 'एसआरए'कडील माहितीनुसार, गोसावी वस्ती येथे ९७१ झोपडीधारक असून, त्याचे क्षेत्र २४ हजार २७९ इतके आहे.
मात्र, प्रस्ताव मंजूर करताना या ठिकाणी तब्बल २ हजार २०७ झोपडीधारक व जागेचे क्षेत्रफळ तब्बल ३९ हजार ९०३ चौरस फूट इतके दाखविण्यात आले. यामध्ये वाढीव झोपडपट्टीधारकांचे पुरावे नसतानाही त्यांना लाभार्थी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. 'एसआरए'चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने यांनीच हा प्रस्ताव मंजूर केला असल्याने त्यांच्या कार्यकाळातील दै. 'पुढारी'ने हा उघडकीस आणलेला ६ वा घोटाळा ठरला आहे. या योजनेतील सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या झोपडपट्टीलगत महापालिकेची ॲमिनिटी प्लॉट, महावितरणचे सब स्टेशन तसेच बाकी सर्व्हिसेसचे क्षेत्र झोपडपट्टी नसतानाही त्याचा या योजनेत सहभाग करण्यात आला आहे.
त्यामुळे योजना राबविणाऱ्या विकसकाला 'टीडीआर'च्या माध्यमातून मोठा फायदा मिळणार आहे. तसेच, या ठिकाणचा २० मीटरचा रस्त्याचा 'एसआरए'मार्फत व महापालिकेकडूनही टीडीआर घेतला जाणार नाही ना, याचीही काहीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात या घोटाळ्यात आणखीच भर पडण्याची शक्यता आहे. या योजनेचे वास्तुविशारद ओंकार असोसिएट्सचे संदीप महाजन असून, ते 'एसआरए'च्या पॅनलवरही आहेत. या योजनेबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
कोथरूडमधील गोसावी वस्तीमधील 'एसआरए' योजनेचे प्रकरण बेकायदेशीर आहे. विकसकाला फायदा मिळवून देण्यासाठी प्रस्तावात प्रचंड अनियमितता करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आणि त्याला मंजुरी देणाऱ्या 'एसआरए'चे तत्कालीन सीईओ नीलेश गटने यांची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊन या प्रकरणाची चौकशी लावण्याची मागणी करू.
उज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेता, पुणे मनपा.