

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचे तिकीट वाटप आता अंतिम टप्यात आले आहे. तिकीट वाटप योग्य झाल्यास भाजपच्या उपनगरातील जागा वाढतील असे स्पष्ट दिसत आहे. अशा जागा वाढणाऱ्या प्रभागात कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी या प्रभागाचाही समावेश होतो.
कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी प्रभागात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, शिवशंभोनगर, महादेवनगर, गोकूळनगर, सुखसागर नगर भाग 2 आणि येवलेवाडी या भागांचा मिळून कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी हा प्रभाग तयार झाला आहे. या प्रभागात विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखालीच प्रचार केला जाईल हे स्पष्ट आहे. पॅनलमधील 40 अ – अनुसूचित जाती, 40 ब- मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 40 क – सर्वसाधारण (महिला) आणि 40 ड - सर्वसाधारण वर्गासाठी खुला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत कोंढवा बुद्रुक येवलेवाडी हा प्रभाग क्र. ४१ ड मधून भाजपच्या रंजना टिळेकर, क मधून वृषाली कामठे आणि अ मधून वीरसेन जगताप असे तीन नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेच्या संगीता ठोसर या प्रभाग क्रमांक 41 ब मधून निवडून आल्या होत्या. ठोसर यांना १० हजार ९५२ मते मिळाली होती
गेल्या जानेवारी महिन्यात शिवसेनेतून निवडून आलेल्या संगीताताई ठोसर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना गेल्या काही निवडणुकीत मिळालेली मते ही पक्षाची नसून त्यांची स्वतः ची आहेत असे विविध सर्वेक्षणे सांगतात. नवीन प्रभाग रचनेनुसार ठोसर यांना मानणारा बराचसा भाग आता प्रभाग क्रमांक 40 मध्ये जोडण्यात आला आहे. अशा परिस्थितीत तिकीट वाटप करताना टिळेकर आणि ठोसर यांच्यात ‘मनोमिलन’ झाल्यास इथुन भाजपचे पूर्ण पॅनल निवडून येऊ शकते व भाजपाच्या संख्याबळात सहज एकाने वाढ होऊ शकते अशी शक्यता आहे.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना उपनगरातील भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये आता ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. संगीता ठोंबरेंनी डीपी रस्ते, अग्निशमन केंद्र, ई- लर्निंग स्कूल अशा कामांचा धडाका लावत प्रभागावरील पकड मजबूत केली. अशा परिस्थितीत त्यांना डावलणे हे भाजपला परवडणारे नाही. अशा स्थितीत टिळेकर - ठोसर मनोमिलन हे भाजपसाठी फायद्याचे ठरेल अशी चर्चा आहे.