नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : शिव संस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा ते प्रयत्न करत होते, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खा. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता केला. ती जागा आता वाचवायची आहे, अशी पुष्टीही पवार यांनी दिली. महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी ओतूर येथे बुधवारी (दि. 8) आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील वेळी कोल्हेंना तिकीट दिलं ही माझी राजकीय जीवनातली चूक होती, ती चूक सुधारण्यासाठी मी आलोय. खासदार म्हणून निवडून आल्यावर ते चित्रपट आणि मालिकांमध्येच रमले. आदिवासी भागात फिरकले नाहीत की कोणाला भेटले नाहीत. या वेळी मात्र बिनकामाचा नको, तर कामाचा माणूस म्हणून आढळराव यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
विधानपरिषदेचे गटनेते भाजप आमदार प्रवीण दरेकर, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशाताई बुचके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव लांडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जुन्नर बाजार समिती सभापती अॅड. संजय काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष समद इनामदार, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, गणपत फुलवडे, माजी आरोग्य सभापती मंगलदास बांदल, माजी सदस्य भानुविलास गाढवे, बबन तांबे, भाऊसाहेब देवाडे, विनायक तांबे, अभिजित शेरकर, विश्वास आमले, दिलीप डुंबरे, तान्हाजी तांबे, उज्ज्वला शेवाळे, दत्ता गवारी, तसेच महायुतीचे विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढळराव म्हणाले, दत्तक घेतलेल्या गावालादेखील कोल्हे कधी गेले नाहीत. त्यांनी पाच वर्षे काही काम केले नाही, पण या बिनकामाच्या माणसाने गेल्या दोन-तीन महिन्यांत मात्र करामती केल्या, वाट्टेल तसे बोलू लागलाय. बैलगाडा शर्यत मी सुरू केली, रेल्वे मी आणली अशी दोन आणि तीन महिन्यांत कामे होत असतात का? असा टोला लगावत अमोल कोल्हे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. प्रवीण दरेकर म्हणाले, पराभव दिसू लागल्याने कोल्हेंनी रडीचा डाव सुरू केलाय. इकडे पैसे वाटले, तिकडे पैसे वाटले, असे ते म्हणू लागले आहेत. पण, तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्याकडे राहुल गांधी, आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत.
या दोघांची तुलना होऊ शकत नाही. मुस्लिम समाजानेही आम्ही या मातीतले आहोत, विकासाचे पाईक आहोत, म्हणून आमच्या मागे राहा, असे त्यांनी आवाहन केले. मुस्लिमांचे व्हिडीओ व फतवे काढून ध्रुवीकरण करायचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. शरद सोनवणे म्हणाले, आदिवासी भागातील पाण्याचे, बुडीत बंधार्याचे, एमआय टॅकचे प्रश्न मार्गी लावायला हवेत. ही लढाई कोल्हे-आढळराव यांची नाही, तर देशाची आहे. देशाच्या भविष्यासाठी अतुल बेनके, आशाताई बुचके आणि मी एकत्र आलो आहोत. आणि आढळराव यांना निवडून आणण्यासाठीच आम्ही एकत्र आहोत, असे ते म्हणाले.
आशाताई बुचके यांनी कोल्हेंना फटकारले. त्या म्हणाल्या, हा व्यक्ती ग्रामपंचायत निवडणुकीत पाच वर्षांत एकदाही मतदानाला आला नाही. त्यामुळे त्याला संविधानावर बोलायचा अधिकार नाही. रस्ते विकासाचा समृद्धी मार्ग आहे, त्यासाठी नितीन गडकरींचे पाठबळ आहे. म्हणून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आढळरावांना मताधिक्याने निवडून द्यायचे आहे. या वेळी देवराम लांडे, मंगलदास बांदल, भानुविलास गाढवे यांनी मनोगते व्यक्त केली.
खासदार कोल्हेंना शेतकर्यांचा खोटा कळवळा आहे. आम्ही अनेकदा कांद्यासाठी आंदोलने केली. आंदोलनासाठी त्यांना बोलाविले, पण त्या वेळी ते कधीच आले नाहीत. निवडणूक आल्यावर त्यांना आता कांद्याचा कळवळा आला आहे. जरा चंदेरी दुनियेतून बाहेर या. शेतकर्यांना जवळून जाणून घ्या, असा टोला अतुल बेनकेंनी लगावला. खासदार झाल्यावर अनेक ठिकाणी कार्यक्रमांना येण्यासाठी कोल्हेंनी लाखो रुपये मागितले. पैसे घ्यायचे आणि कुठंही नाचायचं, अशी त्यांची वृत्ती असल्याचा आरोप बेनके यांनी कोल्हेंवर केला.
विकासकामांसाठी नवीन सरकारमध्ये जाण्याची आम्ही शरद पवारांना विनंती केली. वयस्कर झाल्यावर तेच म्हणाले, राजीनामा देतो आणि दोन दिवसांनी म्हणतात नाही देत. शरद पवार जे म्हणाले ते आम्ही ऐकलं ना, पण किती दिवस ऐकायचं, असे सांगून तुमच्या मुलाबाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही महायुतीसोबत गेल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था आता 'वाजवा तुतारी आणि वयस्कर म्हातारी' अशी झाली आहे, असा टोमणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे यांनी लगावला. खोट्या-नाट्या सोशल मीडियाच्या बातम्या वाचून सर्व कामे मीच केली, असे कोल्हेंनी करू नये, असे सांगतानाच बेनके, बुचके आणि सोनवणे यांचं वादळ आलंय, हवा फिरली आहे, अशी टिपण्णी त्यांनी केली.
हेही वाचा