Kolhapuri dam water shortage news
मांडवगण फराटा: इनामगाव (ता. शिरूर) येथील घोड नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून, दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. चिंचणी धरण दरवर्षी 100 टक्के भरले, तरी श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकर्यांना पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे.
चिंचणी धरणावर पाच धरणे आहेत. ही पाच धरणे पाण्याने भरल्यानंतरच चिंचणी धरणामध्ये पाणी सोडले जाते. तोपर्यंत पावसाळ्याचे ठराविकच दिवस शिल्लक राहतात त्यात पाऊस जोरदार पडला, तरच चिंचणी धरण भरते; अन्यथा ते भरत नाही.
उन्हाळ्याचे अजून काही महिने शिल्लक असताना पुढील आवर्तन मिळेल का याची देखील शाश्वती नसल्याने आगामी काही दिवसांत पुन्हा शेतकर्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कमी पाण्याचा फटका इतर पिकांना देखील बसण्याची शक्यता आहे.
इनामगाव (ता. शिरूर) येथील घोड नदीवरील गांधले मळा येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यात दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. शिरूरच्या पूर्व भागातील इनामगाव, तांदळी, पिंपळसुटी, शिरसगाव काटा आदी गावांमध्ये नदीच्या पात्रातून अनेक शेतकर्यांनी लाखो रुपये खर्च करून शेतीसाठी पाणी उपलब्ध केले आहे.
परंतु दरवर्षी पाणी संपत असल्यामुळे अनेक शेतकर्यांना दरवर्षी पाण्याअभावी फटका बसत आहे. आता तोंडाशी आलेले पिके जळून गेल्यावर राजकीय नेत्यांना जाग येणार का असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.