

शिवदास शितोळे
परिंचे: गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात लग्न जुळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. शेतकर्यांच्या घरात नांदायला सून मिळणे कठीण झाले आहे. मुलांच्या लग्नाचे वय वाढत चालले असून, अनेक जण चाळिशीच्या पार गेले आहेत, तर अनेकांनी लग्न जुळण्याची आशा सोडून दिली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील विवाहेच्छुक तरुण व्यसनांच्या आहारी जाऊन नैराश्याकडे झुकत चालले आहेत. तरीही अनेक जण संयम ठेवून लग्न जुळवण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत. एकूणच हुंडा नको, सोनं नको, फक्त पोरगी द्या मला..! अशी आर्त हाक आता लग्नाळू मुले देत आहेत.
सध्या लग्न जुळवण्यासाठी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत नात्यागोत्यातील मुलींसोबत लग्न जुळवून घेण्याकडे उपवर मुलांच्या पालकांचा कल वाढला आहे. काही ठिकाणी नोकरी, व्यवसाय, गाडी, बंगला सर्वकाही असूनही मुलींच्या तसेच त्यांच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षेमुळे अनेकांचे विवाह रखडले आहेत. त्यातच शेतकरी मुलांची चांगलीच फरपट होत असून, त्यांना मुलगी मिळणे अत्यंत कठीण झाले आहे.
सध्या नोकरदारांसह व्यावसायिकांना मुलींच्या कुटुंबीयांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ’शेतकरी नवरा नको ग बाई’ असे मुली म्हणतात. सध्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. भावी जोडीदार निवडताना मुलींना नोकरीसह मुलाकडे शेतीही हवी असते.
मात्र, शेतकरी नवरा त्यांना नको आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सामाजिक समस्या जटिल झाली आहे. शिकलेल्या मुली व त्यांचे पालक शिकलेला व सरकारी नोकरी व घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. खासगी नोकरी आणि सध्या कमी पगार असला असला तरी चालेल; पण तो शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
जुन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार तर कनिष्ठ नोकरी समजली जायची. आता मात्र उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात आहे. पूर्वी ग्रामीण भागातील तरुण वधू-वर सूचक केंद्रामध्ये नोंदणी करीत नव्हते. मात्र, आता वधू मिळत नसल्याने समाजातील वधू-वर सूचक केंद्रामध्ये नोंदणी वाढली आहे. समाजातील मुलींचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. परिणामी, ग्रामीण भागातील तरुणांना एजंटांची मदत घ्यावी लागत आहे.
शेतकरी मुलांची लग्नासाठी कुचंबणा
सध्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलींच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. उच्चशिक्षित, नोकरी असलेला, निर्व्यसनी पती मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर वरांची कुचंबणा होताना दिसून येत आहे, असे एका वधू-वर सूचक केंद्राच्या संचालकाने सांगितले.
मुलींच्या पालकांचा लग्नाचा खर्च वाचतोय
हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही समाजात आत्तापर्यंत देण्या-घेण्याच्या नावाखाली हुंडा घेतला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. मुलींच्या कुटुंबाकडून यापूर्वी भरमसाट हुंडा घेतला जात होता. त्यामुळे अनेक मुलींच्या पालकांचे दिवाळे निघायचे. मात्र, सध्या मुली कमी झाल्याने दोन्ही बाजूंचा लग्नाचा खर्च करून मुलींच्या वडिलांना काही लाख रुपये देण्यासही अनेक पालक तयार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात अशा पद्धतीने अनेक विवाह पारही पडले आहेत.
लग्न जमवताना फसवणुकीच्या प्रकारांत वाढ
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने ग्रामीण भागात अनेक तरुणांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. फसवणूक करणार्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. पैसे, दागिने घेऊन लग्नाच्या दुसर्या दिवशीच वधू पसार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ’आधीच हौस त्यात पडला पाऊस’ अशी लग्नाळू तरुणांची अवस्था झाली आहे.