Pune News: तोरणागडाच्या पायथ्याशी धानेप (ता. राजगड) येथे बांधण्यात आलेल्या गुंजवणी धरणासाठी घरेदारे, शेती देऊन सर्वस्वाचा त्याग करणार्या कोदापूर भोसलेवाडी पुनर्वसन वसाहतीतील धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा प्रस्ताव वर्षानुवर्षे लालफितीत अडकून पडला आहे. त्यामुळे संतप्त धरणग्रस्तांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
तोरणागडाच्या खोर्यातील निवी, कोदापूर घेवडे, भोसलेवाडी आदी गावे गुंजवणी धरणात बुडाली. कोदापूर व भोसलेवाडी येथील धरणग्रस्तांसाठी धरणाच्या डाव्या तीरावर धानेप ( ता. राजगड) येथे शासनाने पुनर्वसन वसाहत तयार केली आहे. या वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व गावठाण करण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून धरणग्रस्त करत आहेत. महसूल व इतर विभागांच्या समन्वयाअभावी स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव अद्यापही कागदावरच आहे.
त्यामुळे धरणग्रस्तांनी धानेप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, तरीही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी (दि. 25) धरणग्रस्तांच्या बैठकीत देण्यात आला. कोदापूर कानंद सोसायटीचे चेअरमन व माजी सरपंच भीमाजी देवगिरकर, गणपत देवगिरकर, सचिन देवगिरकर, गेनबा भोसले, शिवाजी निगडे, संदीप देवगिरकर, पप्पू भोसले आदी धरणग्रस्तांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामपंचायतीअभावी शासकीय योजनांचा लाभ मिळेना
पुनर्वसन वसाहतीत पक्के रस्तेही नाहीत तसेच जलजीवन योजनेचे काम रखडल्याचे सचिन देवगिरकर यांनी सांगितले. तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही धरणखोर्यातील बुडीत गावठाणात राहत होतो. तेथे आमचे जीवन सुसह्य होते. राष्ट्रासाठी घरेदारे, शेतीवाडी देऊन आम्ही सर्वस्व अर्पण केले.
मात्र, मायबाप सरकार आमच्या व्यथा सोडवत नाही. स्वतंत्र ग्रामपंचायत केल्यास मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, असे गणेश भोसले यांनी सांगितले. दरम्यान, राज्यकर्ते आणि प्रशासन केवळ आश्वासने देतात. ग्रामपंचायत नसल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशा संतप्त भावना महिलांनी मांडल्या.
शासन नियमानुसार पुनवर्सन वसाहतीत 300 लोकसंख्या असल्यास नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करता येते. कोदापूर पुनवर्सन वसाहतीत 450 हून अधिक लोकसंख्या आहे. असे असताना जाणीवपूर्वक शासन स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यास टाळाटाळ करत आहे. येत्या आठ दिवसांत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर ग्रामपंचायतीप्रमाणे विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकला जाईल.
- भीमाजी देवगिरकर, माजी सरपंच, कोदापूर