

नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४३ जागांवर चर्चा झाली. यापैकी जवळपास २६ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर उर्वरित १७ जागांवर पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. तत्पूर्वी काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत ५५ जागांवर चर्चा झाली होती. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ही एक स्वतंत्र बैठक काँग्रेस मुख्यालयात पार पडली. या सर्व बैठकांनंतर काँग्रेसची दुसरी यादी आज किंवा उद्या येणे अपेक्षित आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसच्या कोट्यात येऊ शकणाऱ्या जवळजवळ सर्व जागांवर पक्षांतर्गत सर्व पातळीवर चर्चा झाली आहे. त्यामुळे जागावाटपासाठी यापुढे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत होणार नसल्याचे समजते. यापुढे चर्चा करायची असल्यास राज्यातील नेते दूरदृष्यप्रणालीद्वारे पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि ज्या जागांवर तिढा आहे त्या जागांवर सल्लामसलत करणार असल्याचे समजते.
केंद्रीय निवडणूक समितीच्या आणि छाननी समितीच्या बैठकीला पक्षश्रेष्ठी आणि समिती सदस्यांसह महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील आणि राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.