पुणे : पुढारी वृत्तसेवा : गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आनंदाचा प्रवास… या प्रवासात आरोग्याची काळजी कशी घ्यावी… तपासण्या कधी करून घ्याव्यात… काय खावे आणि काय खाऊ नये… बाळाचा जन्म झाल्यावर एक वर्षापर्यंत कोणते लसीकरण करून घ्यावे… स्तनपान कसे करावे… याबद्दल 'किलकारी'च्या रूपाने मोबाईलवरून साद घातली जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भवतींना तपासण्या, आहार याबाबतचा 'रिमायंडर' म्हणून आगळावेगळा प्रकल्प हाती घेतला आहे. सुदृढ आणि निरोगी बाळ जन्माला यावे आणि गर्भवती महिलेची तब्येतही उत्तम रहावी, यासाठी नऊ महिने तपासण्या, औषधोपचार आणि आहार ही त्रिसूत्री अत्यंत गरजेची असते. बरेचदा महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
अशा वेळी त्यांना 'किलकारी' प्रकल्पाच्या माध्यमातून नऊ महिन्यांच्या प्रवासात 72 प्रकारचे रेकॉर्डेड कॉल केले जात आहेत. एखादा कॉल महिला उचलू न शकल्यास तिला तीनदा रिमायंडर कॉल केला जाणार आहे. गर्भवती महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आशा वर्करना प्रशिक्षण दिले जात आहे. केंद्रीय आरोग्य खात्याकडून 7 फेब—ुवारीला प्रकल्पाला सुरुवात झाली. मोबाईल अकादमीच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यामध्ये ही योजना सुरू झाली आहे. गर्भवती महिलेला चौथ्या महिन्यापासून बाळ एक वर्षाचे होईपर्यंत हे कॉल टप्प्या-टप्प्याने जातील. यामध्ये औषधोपचार, स्वच्छता, लसीकरण याबाबत माहिती देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
हेही वाचा