

शिरूर: भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूर शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक २३ जून रोजी झाली. शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील होते.
या वेळी प्रीतम पाटील यांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, २० जून ते २९ जून या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार असून, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करतील. आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास मतदाराचे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. २००२ च्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना केवळ मॅपिंग फॉर्म भरावा लागणार असून, त्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.
१ जुलै १९८७ पूर्वी जन्म झालेल्या आणि मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तींना जन्मतारीख व जन्मस्थळाचा पुरावा म्हणून निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या ११ पैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल. तसेच, १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ या कालावधीत जन्मलेल्या व्यक्तींना स्वतःचा किंवा आई अथवा वडिलांपैकी एकाचा जन्माचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
५ ऑगस्ट २०२६ रोजी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावा व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या वेळी प्रीतम पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना SIR मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, एकाही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, याची दक्षता घेऊन नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
मतदार नोंदणीसाठी मान्य ११ कागदपत्रे
जन्म दाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी जमीन अथवा घराचे कागदपत्र, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणपत्र तसेच १ जुलै १९८७ पूर्वीचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक ही कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.