

वाल्हे: पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना उलटत आला असतानाही पुरंदर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी तालुक्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असून, पिण्याचे पाणी, पशुधनासाठीचा पाणीपुरवठा आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सध्या तालुक्यातील २४ गावठाणांसह वाड्या-वस्त्यांवर ३२ शासकीय टँकरद्वारे दररोज ८५ खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे.
ऐन पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असल्याने अनेक गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे विविध गावांमधून टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. पुरंदर पंचायत समितीच्या माहितीनुसार, पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे नागरिक आणि जनावरांची तहान भागविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातूनही डिसेंबर महिन्यापासून दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदा मान्सूनपूर्व तसेच मान्सून पावसानेही अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या आणि शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे काही भागांत चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करून दावणीवरील पशुधन वाचवावे, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.
धरणांतील पाणीसाठा तळाला
पुरंदर तालुक्यातील नाझरे, गराडे, माहूर, घोरवडी, पिलाणवाडी आणि वीर नाला धरणांमध्ये सध्या केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे, तर पिंगोरी येथील जय गणेश जलाशयात अवघा १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू असूनही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांतील धरणे, विहिरी, ओढे-नाले, तलाव आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.
या गावांसाठी टँकर सुरू
पुरपोखर, भिवरी, पिसे, साकुर्डे, बहिरवाडी, वागदावाडी, भिवडी, राख, राजुरी, वाल्हे, सोनोरी, बोपगाव, शिवरी, कोडीत बुद्रूक, दौंडज, झेंडेवाडी, गराडे, टेकवडी, धनकवडी, मांढर, काळदरी, चांबळी, थापेवाडी-वारवडी आणि तक्रारवाडी या गावठाणांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर दररोज ३२ टँकरद्वारे ८५ खेपा सुरू असल्याची माहिती पुरंदर पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता वैभव ढोक यांनी दिली.