

खेड शिवापूर : खेड शिवापूर परिसरात गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून, गॅस एजन्सीमध्ये ग््रााहकांची गर्दी होत आहे.
खेड शिवापूर परिसरात औद्योगिकीकरण वाढले असल्याने नागरिकीकरणात वाढ झाली आहे. परिणामी गॅसची मागणी वाढली आहे. मुख्य वितरकांव्यतिरिक्त इतर उपवितरक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपर्यंत तत्काळ मिळणारा गॅस आता सहा ते सात दिवसांपूर्वी बुक करून देखील मिळत नसल्याची स्थिती आली आहे.
खेड शिवापूर भागात हॉटेल व्यावसायिक, तसेच इतर खाद्यपदार्थ व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वच व्यावसायिकांना गॅसपुरवठा बंद झाल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. काही छोट्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवला असून, मोठ्या व्यावसायिकांनी चुलीवर स्वयंपाक सुरू ठेवला असल्याचे दिसून आले.
यापूर्वी शिवगंगा खोऱ्यात अनधिकृतपणे जादा दराने गॅस विक्री केली जात होती. आताही ती अगदी चढत्या दराने सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच त्यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे असल्याची चर्चा खेड शिवापूर भागात सुरू आहे.
गॅसची गाडी दिवसाआड येत होती, ती आता सहा दिवसांनी आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आधीच बुकिंग केले होते त्यांना गॅस सिलिंडर वितरित केले जात आहेत. ज्यांनी बुकिंग केले नाही त्यांना नाईलाजास्तव नकार द्यावा लागत आहे.
प्रदीप रेडे, वितरक, भारत गॅस
आम्ही पहिल्यापासूनच बऱ्यापैकी चुलीवर स्वयंपाक करतो. गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहेच. बुकिंग केलेले सिलिंडर मिळत आहेत; मात्र पूर्वीपासून चुलीवर स्वयंपाक असल्याने त्याचा फायदा आता होत आहे.
शंकर कोंडे, संचालक, हॉटेल जय भवानी बिर्याणी