

खेड: खेड तालुक्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कामाला शासनाने 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खेड पंचायत समितीच्या आवारात ही इमारत उभारण्यात येणार आहे.
जागेची 5 मे ला शासकीय मोजणी करण्यात येणार आहे. यानंतर पंचायत समिती इमारतीसह, शिक्षण विभाग, जीर्ण झालेल्या निवासी खोल्या पाडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली. प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. (Latest Pune News)
खेड पंचायत समितीच्या स्वामालकीच्या सर्व्हे क्र. 19, 20 आणि 21 अ मध्ये ही इमारत होणार आहे. वाहनतळ, तळमजला आणि वरील चार मजल्यांवर अ आणि ब अशा दोन विभाजनात तालुकास्तरीय विविध 20 प्रशासकीय कार्यालयांच्या प्रस्तावानुसार 5552 चौरस मीटर (59 हजार 850 चौरस फूट) जागा उपलब्ध होणार आहे.
त्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांताधिकारी), भूमिअभिलेख, ट्रेझरी, निबंधक कार्यालय (सहकारी संस्था), तालुका कृषी अधिकारी, उपनिबंधक कार्यालय, वन विभागाचे विभागीय कार्यालय, निरीक्षक उत्पादन शुल्क कार्यालय, लेखापरीक्षक कार्यालय, उपविभागीय अभियंता - लघु पाटबंधारे, निरीक्षक वैधमापन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, सेतू सभागृह (250 आसन क्षमता), व्हीआयपी अभ्यागत कक्ष, संगणक कक्ष, लोकअदालत कक्ष, मिटींग हॉल, अभिलेख कक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी सध्या येथे कार्यरत असलेली पंचायत समिती व संलग्न सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत. कामात अडथळा येणार नाही याची दक्षता घेऊन नवे काम सुरू करण्यात येईल. दक्षिणेकडील जागेत होत असलेले पंचायत समितीच्या नूतन कार्यालयाचे काम आणि नव्याने सुरू करण्यात येणारे प्रशासकीय इमारतीचे काम दर्जेदार व लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- बाबाजी काळे, आमदार.
सगळी प्रशासकीय कार्यालये एकत्र आणून तालुक्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या नागरिकांना एकाच छताखाली आपली कामे करता यावीत यासाठी नियोजित इमारतीचे काम 2019 मध्ये प्रस्तावित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2021 मध्ये मंजुरीसह मोठा निधी दिला. या इमारतीमुळे शहरातील वाहतूक कोंडीची मुख्य समस्या निकाली निघून एकत्र कार्यालये आल्याने लोकांना आपले काम करून घेताना सुलभ होणार आहे. या इमारतीला मोठा विरोध करणारे माझ्या धोरणात्मक कामाचे श्रेय घेण्यासाठी आता पत्रकार परिषद घेत आहेत.
- दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार.