वेल्हे: पुणे-पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे (ता. राजगड) गावाजवळ विद्युत तारांचा गाडीला स्पर्श झाल्याने लागलेल्या भीषण आगीत हायवा गाडी जळून खाक झाली. चालकाने प्रसंगावधानता दाखवत गाडीतून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी 5 वाजेच्या सुमारास घडली.
हायवा गाडी पुणे रिंगरोडच्या कामासाठी होती. या वेळी गाडी कामाच्या ठिकाणी नेताना रस्त्यावर आडव्या आलेल्या तारांचा गाडीला स्पर्श झाला. तारांच्या घर्षणातून काही कळण्याच्या आतच गाडीने पेट घेतला. (Latest Pune News)
भडका उडून आगीने रौद्ररूप धारण केले. याबाबत माहिती मिळताच पानशेत पोलिस चौकीचे हवालदार पंकज मोघे व आकाश पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला कळविले.अग्निशमन दलाच्या घटनास्थळी येत आग नियंत्रणात आणली; मात्र तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. याबाबत हवेली व वेल्हे पोलिस तपास करीत आहेत.