खडकवासला: महसूल अभियानांतर्गत सिंहगड भागासह हवेली तालुक्यातील 25 गावांतील शिवकालीन पांदण रस्त्यावरील अतिक्रमणे काढून 28 रस्ते खुले करण्यात आले. त्यामुळे शेतकर्यांसह स्थानिक रहिवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे म्हणाले, पहिल्या टप्प्यात अवघ्या दोन आठवड्यांत 25 गावांतील 28 रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली. सर्व 28 रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. सध्या दुसर्या टप्प्यात देखील ही मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत शंभरहून अधिक रस्ते खुले करण्यात येणार आहेत. (Latest Pune News)
मांडवी बुद्रुकचे माजी सरपंच सचिन पायगुडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून वहिवाट असलेल्या पांदण रस्त्यावर अनेक वर्षांपासून अतिक्रमणे होती. गाव नकाशात पांदण रस्ता होता. मात्र, प्रत्यक्षात अतिक्रमणांमुळे तो बंद होता.
अतिक्रमणे काढून रस्ता खुला करण्यात आल्याने शेतकर्यांची शेतीमालाच्या वाहतुकीसह ये-जा सुरू झाली आहे. पांदण रस्ते खुले करण्याच्या अभियानास शेतकर्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या अभियानामुळे गावोगावचे शिवकालीन पाणंद व गाडी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकर्यांसह स्थानिक रहिवाशांची गैरसोय दूर होत आहे. गावनकाशातील रस्ते खुले करण्यासाठी स्थानिक शेतकर्यांनी समंजसपणे एकत्र काढावा; अन्यथा कागदपत्रांच्या आधारे गावनकाशातील रस्ते खुले करण्यात येणार आहेत.
- डॉ. यशवंत माने, उपविभागीय अधिकारी, हवेली तालुका