

पुणे: खराडीतील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक पुरावे लागले असले तरी तपासासमोर आता 'पासवर्ड'चे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आश्रमातून जप्त केलेल्या पेनड्राईव्ह, हार्डडिस्क, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल साधनांमध्ये या प्रकरणातील अनेक धक्कादायक रहस्य दडलेली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या सर्व उपकरणांचे पासवर्ड आरोपींकडेच असून, तपासात त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर मुख्य आरोपी राधामोहन मिश्राची चौकशी सुरू केली.
मात्र, कोठडीदरम्यान त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे तपासाचा वेग काहीसा मंदावल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय उपचारांनंतरही चौकशीदरम्यान मिश्रा फारशी माहिती देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणातील महिला आरोपींकडूनही तपास यंत्रणांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात असून, डिजिटल उपकरणांबाबतची महत्त्वाची माहिती देण्यासही त्या टाळाटाळ करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आश्रमातून जप्त केलेल्या १९ हार्डडिस्क, २३ पेनड्राईव्ह, लॅपटॉप आणि मोबाईलमधील माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या उपकरणांमध्ये आश्रमातील व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण, अनुयायांची माहिती तसेच अन्य काही संवेदनशील नोंदी असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या डिजिटल पुराव्यांमधून प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिस घेणार आता सायबरतज्ज्ञांची मदत
पोलिसांकडून आता सायबरतज्ज्ञांची मदत घेऊन जप्त केलेल्या उपकरणांमधील माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपकरणांतील माहिती उघड झाल्यास आणखी काही पीडित समोर येण्याची तसेच प्रकरणात नवीन गुन्ह्यांची भर पडण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तपासाच्या या टप्प्यावर मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मौनच अनेक प्रश्न निर्माण करत आहे. जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांमधून नेमके काय समोर येते, याकडे आता तपास यंत्रणांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.