

पिंपरी : फुगेवाडीच्या पुढे सिव्हिल कोर्ट, रुबी हॉल व वनाजपर्यंत मेट्रो धावण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या मार्गावरील खडकी व रेंजहिल्स हे दोन मुख्य स्टेशनच नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे. खडकी स्टेशनचे काम प्राथमिक अवस्थेत असून, रेंजहिल्स स्टेशनचे कामच सुरू नसल्याचे चित्र आहे. पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी या अपुर्या मार्गावर तब्बल दीड वर्ष मेट्रो धावत होती. पुणे शहराशी मेट्रो जोडली न गेल्याने नागरिकांचा मेट्रो प्रवासाला प्रतिसाद नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी नव्या मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर एकमेकांशी जोडले गेले आहेत.
मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती
नागरिक प्रवाशांसाठी मेट्रोला पसंती देत आहेत. तसेच, कुतहल, उत्सुकता आणि मेट्रो रपेटसाठी मेट्रोतून नागरिक प्रवास करीत आहेत. संपूर्ण कुटुंब, मित्रमंडळी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गट तसेच, बालगोपाळ मेट्रो प्रवास करीत आहेत. उंचावरून धावणार्या मेट्रोतून दोन्ही शहरांचे सौदर्य पाहण्याचा आनंद घेत आहेत. तसेच, जमिनीखाली भुयारात असलेल्या शिवाजीनगर व सिव्हिल कोर्ट या स्टेशनची पाहणी करताना नागरिक हरखून जात आहेत. लिफ्ट, फिरते जिने, स्वच्छता, सुशोभीकरण पाहून समाधान व्यक्त केले जात आहे.
उशीरा जागा मिळाल्याने खडकी मेट्रो स्टेशनच्या कामास विलंब
खडकी येथे मेट्रो स्टेशन उभारण्यास तसेच, मार्गिकेसाठी नवी दिल्लीच्या संरक्षण विभागाकडून उशीरा जागा ताब्यात आली. स्टेशनचे काम विलंबाने सुरू झाले आहेत. स्टेशनचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने सध्याच्या मार्गातून खडकी स्टेशन वगळण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर खडकी स्टेशन सुरू करण्यात येईल. नागरिकांना स्टेशनचा लाभ घेता येईल. रेंजहिल्स स्टेशनबाबत संरक्षण विभागाने आक्षेप घेतले आहेत. तसेच, अद्याप जागा ताब्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या रेंजहिल्स स्टेशन वगळण्यात आले आहे, असे महामेट्रोचे महाव्यवस्थपक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
नागरिकांना मारावा लागतोय लांबून वळसा
मात्र, या मार्गावरील भारतीय लष्कर व संरक्षण विभागाशी निगडित असलेल्या तसेच, खडकी बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या खडकी स्टेशन तसेच, रेंजहिल्स हे दोन स्टेशन वगळण्यात आले आहेत. शिवाजीनगर स्टेशन सोडल्यानंतर थेट बोपोडी स्टेशनची उद्घोषणा होत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. खडकी व रेंजहिल्स येथे चढता किंवा उतरता येत नसल्याने थेट बोपोडी किंवा शिवाजीनगर गाठावे लागत आहे. परिणामी, खडकी, खडकी बाजार, औंध रस्ता, रेंजहिल्स, पुणे-मुंबई जुना महामार्ग, भोसलेनगर, रेंजहिल्स कॉर्नर येथील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्यास लांबचा वळसा मारावा लागत आहे.
प्रवाशांची नाराजी
दरम्यान, खडकी रेल्वे स्टेशनशेजारी सीएएफव्हीडी डेपो मैदान येथे खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. ते काम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. स्टेशनचे केवळ बीम व कॉलम उभे आहेत. हे स्टेशन तयार होण्यास किमान वर्षभरचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तर, रेंजहिल्स स्टेशनचे काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे हे स्टेशन वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या स्टेशनवर मेट्रो थांबत नसल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा :