

पुणे: खडकवासला धरणातून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३ हजार ५७१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केल्याने मुठा नदीकाठच्या नागरिकांना पुराचा फटका बसला. धरणसाखळीतील बहुतांश धरणे पूर्णक्षमतेच्या उंबरठ्यावर पोहचल्याने महापालिका आणि प्रशासनाने हायअलर्ट घोषित केला असून, वारजे तपोधाम, पाटील इस्टेट, पुलाची वाडी आणि रजपूतवस्ती या नदीकाठच्या भागांतील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सिंहगड रस्ता परिसरातील चार सोसायट्यांमधील ४० कुटुंबांतील १०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत खडकवासला परिसरात ५६.६० मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली. कोथरूड-बावधनमध्ये ४०.४० मिमी, वारजे-कर्वेनगरमध्ये ३८.४० मिमी, कसबा-विश्रामबागवाडा येथे ३७.४० मिमी, सिंहगड रस्ता परिसरात ३६ मिमी, तर भवानी पेठेत ३२.६० मिमी पाऊस झाला. शहरातील बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.
धरणसाखळीतील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर पोहचला आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असून, पानशेतमध्ये ९८.६८ टक्के, वरसगावमध्ये ९७.३१ टक्के, पवना ९९.७२ टक्के, तर मुळशी धरणात ८७.६२ टक्के पाणीसाठा आहे. पानशेतमधून १८,११५ क्युसेक, वरसगावमधून ५,२०० क्युसेक, पवना धरणातून ८,४०० क्युसेक आणि मुळशीतून ८,८०० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. खडकवासला धरणातील ४३,५७१ क्युसेक विसर्ग कमी करून ३७,५९८ क्युसेक करण्यात आला आहे.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, पथ, विद्युत, उद्यान, मलनिस्सारण, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य पूरबाधित भागांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार आणखी स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्र सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सिंहगड रस्ता क्षेत्रातील जलपूजन अपार्टमेंट, शारदा सोसायटी, द्वारका आणि आनंद पार्क येथील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅडमिंटन हॉलमध्ये हलविण्यात आले. तसेच शहरातील संभाव्य पूरबाधित ४९ ठिकाणी मदत केंद्र सुरू केली असून, सर्व विभागांना २४ तास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, दिवसभरात झाडे किंवा फांद्या पडणे, चेंबर तुंबणे आदी स्वरूपाच्या नऊ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त झाल्या. अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व तक्रारींचे निराकरण केले. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्णक्षमतेने सज्ज ठेवली आहे. अग्निशमन दल, पोलिस, पथ विभाग, मलस्सारण विभाग, नियंत्रण कक्ष तसेच हवामान विभाग, सी-डॅक, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सिंचन विभाग यांच्याशी सातत्याने समन्वय साधला जात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाची नोंद (मिमी)
खडकवासला : ५६.६०
कोथरूड-बावधन : ४०.४०
वारजे-कर्वेनगर : ३८.४०
कसबा-विश्रामबागवाडा : ३७.४०
सिंहगड रस्ता : ३६.००
भवानी पेठ : ३२.६०
धरणस्थिती आणि सध्याचा विसर्ग
खडकवासला - १०० टक्के विसर्ग ३७५९८ क्युसेक
पानशेत - ९८.६८ टक्के
विसर्ग १८,११५ क्युसेक
वरसगाव - ९७.३१ टक्के विसर्ग ५,२०० क्युसेक
पवना - ९९.७२ टक्के
विसर्ग ८,४०० क्युसेक
मुळशी - ८७.६२ टक्के
विसर्ग ८,८०० क्युसेक