Khadakwasla dam : पुणेकरांच्या जीवाशी खेळ ! खडकवासला धरणात औषधांचा खच

Khadakwasla dam : पुणेकरांच्या जीवाशी खेळ ! खडकवासला धरणात औषधांचा खच

पुणे/खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणाच्या पाण्यात औषधांचा खच फेकल्याचा गंभीर प्रकार बुधवारी (दि. 18) उघडकीस आला. ही औषधे धरणात फेकणार्‍यांचा शोध हवेली पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकारामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, तसेच धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औषधांच्या बाटल्या रिकाम्या असल्याचे सांगितले जात असले, तरी काही बाटल्यांत औषध होते. या औषधांची मुदत संपल्याने सरकारी दवाखान्यातील कर्मचार्‍याने अथवा खासगी मेडिकल दुकानदाराने औषधे, सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन व इतर वस्तू फेकून दिल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खबरदारी म्हणून औषधांच्या बाटल्या, तसेच औषधांची तपासणी करण्यात येणार असल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. धरणतीरालगतच्या पाण्यात औषधांचा खच पडला असल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाचे गिरिजा कल्याणकर व सहायक अभियंता दत्तात्रय कापसे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास धरणतीरावरील एका सुरक्षारक्षकाला पाण्यात औषधांचे खोके आणि बाटल्या दिसल्या. मोठ्या प्रमाणात औषधे, बाटल्या असल्याने त्याने तातडीने जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. औषधांच्या बाटल्या रिकाम्या होत्या. त्यात कोणत्याही प्रकारची औषधे नव्हती. असे असले तरी याबाबत सखोल चौकशी सुरू आहे, असे हवेली पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, खडकवासला धरणाच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. धरणाच्या पाण्यात उतरण्यास बंदी आहे. मात्र, तरीही अनेक पर्यटक पाण्यात उतरतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने सुरक्षारक्षकांना मर्यादा आहेत. बुधवारच्या प्रकारानंतर दिवसभर धरण परिसरात 13 सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

सुरक्षारक्षक फक्त दिवसाच

धरणाच्या मुख्य भिंतीसह परिसराच्या सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने 13 खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहे. दिवसा धरण चौपाटीसह परिसरात सुरक्षारक्षक पहारा देतात. रात्री मात्र सुरक्षारक्षक तैनात केलेले नसतात. त्यामुळे रात्रीच्या सुमारास धरणात औषधे फेकण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास चौपाटी, तसेच धरणतीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावर गैरप्रकार घडत आहेत. दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीही धरण परिसरात सुरक्षारक्षक ठेवण्यात यावेत, अशी मागणी खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते यांनी केली आहे.

जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणार्‍या एका खासगी कंपनीची खोकी आणि बाटल्या खडकवासला धरणाच्या जलाशयात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र, ही खोकी आणि बाटल्या रिकाम्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण किंवा परिणामांबाबत तपासणी करण्यात येत आहे, तर पोलिसांकडून या प्रकाराबाबत तपास करण्यात येत आहे.

– श्वेता कुर्‍हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news