खडकवासला: पानशेत, वरसगाव खोर्यात पावसाळी वातावरण कायम असून, डोंगरी पट्ट्यात अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. रविवारपेक्षा सोमवारी धरणसाठ्यात पाण्याची आवक कमी झाली असली, तरी ओढ्या-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू आहे.
त्यामुळे खडकवासला धरणाच्या विसर्गात 3 हजार 850 क्सुसेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जादा पाणी सोडूनही खडकवासलातील पाणीपातळी 64 टक्क्यांवर कायम आहे.(Latest Pune News)
पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणाच्या एकूण क्षमतेच्या अडीच पट म्हणजे 4.64 टीएमसी पाणी अवघ्या 22 दिवसांत धरणातून मुठा नदी व मुठा कालव्यात सोडण्यात आले. यातील 4.24 टीएमसी मुठा नदीत, तर 0.40 टीएमसी पाणी मुठा कालव्यात सोडण्यात आले आहे. सोमवार (दि. 7) सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे.
मात्र, गेल्या आठ दहा दिवसांपासून पडलेल्या संततधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू असल्याने गेल्या 24 तासांत साखळीत 0.69 म्हणजे जवळपास पाऊण टीएमसी वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 19.32 टीएमसी म्हणजे 66.28 टक्के पाणीसाठा झाला होता. रविवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 18.63 टीएमसी पाणी होते.
धरणक्षेत्रात 15 मेपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे वरील धरणांतून पाणी न सोडताही खडकवासलाच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे 16 जूनपासून धरणातून जादा पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. आजपर्यंत अवघ्या 22 दिवसांत 4.24 टीएमसी पाणी नदीत सोडले असून, त्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे. 19 जूनपासून 16 दिवस मुठा कालव्यात 0.40 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
- गिरिजा कल्याणकर, शाखा अभियंता, खडकवासला धरण विभाग