येरवडा: ‘लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करत असून, अफवाही पसरवत आहेत. या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले.
येरवडा, जनतानगर, नवी खडकी येथे शिवसेना (शिंदे गट) जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी नागरिकांना छर्त्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. (Latest Pune News)
पक्षाचे शहर संघटक आनंद गोयल यांच्या पुढाकारातून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या वेळी सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, उपशहरप्रमुख सुनील जाधव, महिला आघाडी संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, माजी नगरसेविका सुरेखा कदम, राजेंद्र शितोळे, महेंद्र गायकवाड, दीपक चव्हाण, सनी पवार, अमोल दामजी आदी उपस्थित होते.
डॉ. गोर्हे म्हणाल्या की, शिवसेनेच्या वतीने येरवडा भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी दर शुक्रवारी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच महिलांसाठी संगणक, माहिती पुस्तिका आणि अन्य प्रशिक्षण साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी देत आहे.