बिबवेवाडी: बिबवेवाडी परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे पडून रस्त्यांची अक्षरशा: चाळण झाली आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीकडे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
परिसरातील अप्पर, सरगम चाळ, शेळके वस्ती, पवननगर, श्रेयसनगर, पद्मावतीनगर, सुपरचा काही भाग आणि विश्वकर्मा महाविद्यालयाच्या परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Pune News)
सध्या पडत असलेल्या पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. काही ठिकाणी ठेकेदारांनी आपल्या मर्जीनुसार कामे केली आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याने खड्डे पडले असल्याचे रहिवासी गणेश मोहिते यांनी सांगितले.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, नागरिक आणि विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. तसेच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारवर नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
बिबवेवाडी परिसरात केंद्रीय मंत्री येणार म्हणून महापालिका प्रशासनाने मुख्य रस्त्याची तातडीने दुरूस्ती केली. परंतु अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनची देखील दुरवस्था झाली आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने रस्त्यांची ही अवस्था झाली आहे.
-अमोल परदेशी, रहिवासी, बिबवेवाडी
बिबवेवाडी परिसरातील रस्त्यांची लवकरात दुरूस्ती करण्यात येईल. यासाठी रस्त्यांचा सर्वे करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.
-नलिनी सूर्यवंशी, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय