Maharashtra Assembly Polls: चौकार लागणार की नवे गडी, नवा राज्य येणार?

खडकवासला मतदारसंघावर गेली तीन टर्म भाजपचे वर्चस्व
 Maharashtra Assembly Poll
चौकार लागणार की नवे गडी, नवा राज्य येणार? file photo
Published on: 
Updated on: 

Pune Politics: खडकवासला विधानसभा मतदारसंघात सध्या सर्व उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गेली पंधरा वर्षे भारतीय जनता पक्षाने वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, मागील निवडणुकीत घटलेले मताधिक्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला मिळणारा वाढता पाठिंबा आणि मनसेच्या उच्चशिक्षित उमेदवाराची ‘एंट्री’ ही मोठी आव्हाने विद्यमान आमदारांसमोर आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यात भाजपचा चौकार लागणार की नवा गडी, नवे राज्य येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावे आणि खडकवासला परिसरातील ग्रामीण भाग मिळून तयार झालेल्या या मतदारसंघाचे सुमारे 20 वर्षांत झपाट्याने शहरीकरण झाले आहे. पूर्वी मतदारसंघावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. 2011 च्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा भाजपला या मतदारसंघातून यश मिळाले. त्या वेळी भीमराव तापकीर हे निवडून आले. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत सलग दुसर्‍यांना निवडून येण्याचा मान त्यांनी मिळाविला. 2019 मध्ये एकदम चुरशीच्या झालेल्या लढतीत तापकीर यांनी ‘हॅट्ट्रिक’ साधली.

 Maharashtra Assembly Poll
एकट्या झिरवाळांना का दोष देता? भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांचा

यंदाच्या निवडणुकीत पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये खडकवासल्यातील उमेदवाराचे नाव भाजपने जाहीर केले नव्हते. तापकीर यांना अंतर्गत विरोध असल्याने उमेदवारीबाबत धाकधूक वाढली होती. गेल्या तिन्ही टर्ममध्ये खडकवासलामध्ये आमदारांनी विकासाचा समतोल न साधल्याची तक्रार पक्षाकडे प्राप्त झाली होती.

मात्र, सलग तीन विजय मिळवल्याने कोणतीही जोखीम न पत्करता भाजपने तापकीर यांनाच उमेदवारी जाहीर केली. आता तापकीर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झालेले असताना त्यांना रोखण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. खडकवासलातील माजी नगरसेवक आपापल्या भागात हिरीरीने प्रचार करतात की बघ्याची भूमिका घेतात, यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

या मतदारसंघात शहरी मतदारांची संख्या वाढल्याने हातातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांना विजयासाठी केवळ 2500 मते कमी पडली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही दोडकेंनी पक्षाशी एकनिष्ठता दाखवून मतदारसंघात खडकवासल्यात बांधणी केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या खासदाराच्या विजयासाठी त्यांनी जिवाचे रान केले. त्यामुळे पक्षनेतृत्वाचा विश्वास संपादन करण्यात यश आले आहे. दोडके यांना आंबेगाव, नर्‍हे, धायरीसह वारजे माळवाडीतून पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोडके यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

 Maharashtra Assembly Poll
प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूट : काँग्रेसचा आरोप

भीमराव तापकीर आणि सचिन दोडके यांच्यामध्ये सरळ लढत होईल, असे वाटत असतानाच दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयूरेश वांजळे मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता ही लढत तिरंगी झाली आहे. उच्चशिक्षित उमेदवार अशी आपली छाप पाडून मतदारांना आकर्षित करून घेण्यात सध्या तरी मयूरेश वांजळेंनी बाजी मारली आहे. त्यांची बहीण सायली वांजळे यांनीही प्रचारात उडी घेतली आहे. तापकीर आणि दोडके हे दोन्ही उमेदवार मान्य नसलेल्या मतदारांची मते वांजळे यांच्या पारड्यात पडणार आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी करण्यासाठी भाजपनेच मनसेचा उमेदवार उभा केल्याची चर्चा मतदारसंघात सर्वत्र ऐकायला मिळते. वांजळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत महायुतीचा एक घटक म्हणून लोकसभा निवडणुकीत कार्यरत होते, ते आता मनसेकडून लढत आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या मतांवर परिणाम होणार अशीही चर्चा दुसरीकडे सुरू आहे. त्यामुळे मनसेचे इंजिन नेमके कोणाला धडक देणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

कोण जाणार विजयासमीप?

भौगोलिकदृष्ट्या शहरी आणि ग्रामीण भाग असा संमिश्र असलेला हा मतदारसंघ आहे. निवडणुकीसाठी विजयरथ खेचून आणण्यासाठी उमेदवारांना शहरी व ग्रामीणची नाळ जोडावी लागणार आहे. जो उमेदवार हे समीकरण साधण्यात यशस्वी होईल, तो विजयासमीप जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळेच सध्या प्रचारामध्येही शहरी आणि ग्रामीण भाग असा समतोल साधण्यावर उमेदरावांनी लक्ष केंद्रित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news