

दिंडोरी : जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह सर्वच्या सर्व 52 राष्ट्रवादीच्या आमदारांनी पहाटेच्या शपथविधी वेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातील छगन भुजबळ यांच्यासह सर्व आमदारांनी एकत्रितपणे विकासासाठी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असताना एकट्या झिरवाळ यांनाच का दोष देता? झिरवाळ आदिवासी आहे म्हणून त्यांची कोंडी करणे योग्य नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत दिंडोरी पेठच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी झिरवाळांसारख्या उत्तम व्यक्तीमत्वाला माझ्यासोबत विधानसभेत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दिंडोरी - पेठ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांचे प्रचारार्थ वणी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर माजी आमदार धनराज महाले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,सुरेश डोखळे, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, भाजप नेते नरेंद्र जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदींसह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपण केलेली विकासकामे सांगतानाच विरोधकांच्या जातीयवाद टीकेचा खरपूस समाचार घेतला. विरोधक कधी कोणत्या समाजाच्या सुखदुःखात गेले नाही की समस्या सोडविल्या नाही, अशा शब्दांत त्यांनी टिका केली. उपमुख्यमंत्री पवार आपल्या भाषणात म्हणाले, महायुतीचे सरकार हे लोकाभिमुख काम करत आहे. योजनांना थेट कोर्टात जाऊन विरोध करणारे आता जाहीरनाम्यातून घोषणांचा पाऊस पाडत आहेत. सर्व योजना सुरूच राहणार आहे. लोकसभेला संविधान बदल, असा फेक नेरेटिव्ह पसरवत मते घेतली. पण आता सर्वांना कळले आहे. आता यांच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. झिरवाळ यांनी सिंचन दळणवळण वीज शिक्षण आरोग्य आदी सर्वांगीण कामे करत मतदारसंघ विकासाकडे नेत आहे, अशा शब्दांत पवार यांनी कौतुक केले.
माजी आमदार धनराज महाले इच्छुक होते. महायुतीत गैरसमजातून त्यांना शिवसेनेने थेट हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिला. पण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना माघारीची सूचना करत युतीच्या प्रचाराला लागा, असे सांगितले. धनराज महाले सच्चा माणूस त्यांनी माघार घेतली अन ते प्रचाराला लागले. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. मीसुध्दा त्याचा पाठपुरावा करेल व महाले यांना त्यागाचे फळ मिळेल, असे अजित पवार यांनी सांगितले.
पुण्याच्या एक द्राक्ष निर्यातदार महिलेने येथील अनेक द्राक्ष उत्पादकांना फसवले त्यांनी मला सांगितले आपण पोलिसांना आदेश देताच परदेशात फरार संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली. द्राक्ष उत्पादकांना फसवणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.
नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा बँक वाचविण्यासाठी पाठपुरावा केला.700 कोटी मदतीचा प्रस्तावही तयार होता. पण आचारसंहिता लागल्याने प्रस्ताव अडकला आहे. ण पुन्हा महायुती सरकार येताच जिल्हा बँकेला मदत करत तुमची अर्थवाहिनी पुन्हा सुरू करू, असे पवार यांनी सांगितले.