मुंबई : Maharashtra Assembly Polls | महागाईच्या माध्यमातून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या या मूळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे, कटेंगे, व्होट जिहादसारखी नारेबाजी केली जात आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केला आहे.
खेरा म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपाचे गल्लीतील नेतेही जगातील सर्व मुद्द्यांवर प्रवचन देतात; पण जनतेला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवर एक शब्दही बोलत नाहीत, हीच भाजपाच्या प्रचाराची दिशा आहे. झारखंडमधील प्रचारात पंतप्रधान मोदींनी घुसखोरी झाल्याचे सांगितले, पण देशात तर ११ वर्षांपासून मोदींचेच सरकार आहे, मग ही घुसखोरी झालीच कशी? महाराष्ट्राच्या प्रचारातही तेच होत आहे. बटेंगे कटेंगे, एक हैं, तो सेफ हैं, व्होट जिहाद हेच सुरू आहे. भाजपा जनतेला मूर्ख समजत असेल, पण जनतेला भाजपाचा हा डाव चांगलाच माहीत आहे. प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटून महिलांना १५०० रुपये दिल्याच्या फुशारक्या मारत आहेत. मोदी व भाजपाने ९० हजार रुपयांच्या लुटीचा हिशोब द्यावा, असे पवन खेरा म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसूण ५०० रुपये किलो, तर कांदा १०० रुपये किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे भोजनाचे बजेट कोलमडले आहे, अशा शब्दांत खेरा यांनी मोदी सरकारवर टीका केली.