

Ketan Agrawal Case: पुण्यातील उद्योगपतींचा मुलगा केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून त्यांनी लोहगडावरून केतनला ढकलून देऊन त्याचा खून केल्याचा आरोप केला आहे. त्या दृष्टीकोणातून पोलिस तपास करत आहेत.
सियाचे वर्तन आणि तिच्या घरचांचा तपास याबाबत समाज माध्यमांवर दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. त्यातच आता पोलिसांनी सिया आणि चेतन यांच्या प्लॅनिंगमध्ये तिसरा व्यक्ती देखील असल्याचा दावा केला असून ही माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर येत आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या वर्गमित्राला सिया आणि चेतनच्या सर्व प्लॅनिंगची माहिती होती असा दावा सूत्रांकडून केला जात आहे.
दरम्यान, गुरूवारी पोलिसांनी सिया गोयलच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी सियाला देखील सोबत आणण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांचे कॅमेरे सियावरच खिळले होते. याचवेळी सियाने माध्यमांना हाताचं मधलं बोट दाखवत अश्लील इशारा केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांवर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांकडून सियाचा आचरणाबाबत कधीही अधिकृत टिप्पणी केली गेलेली नाही. मात्र पबमधील तिचे कथित व्हिडिओ बाहेर आले आहेत. त्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाची प्रत्येक कडी जोडून आपली केस स्ट्राँक करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस सध्या पुरावे गोळा करत आहेत. हा घटनाक्रम समजून घेण्यासाठी सिया आणि चेतन यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथं रिक्रिएशन करण्यात आलं आहे. पोलीस या दोघा आरोपींना घेऊन लोहगडावर देखील गेले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात अजून एका युवकाचे नाव आले आहे. हा युवक चेतन चौधरीचा वर्गमित्र राहिला आहे. तो मुळचा महाराष्ट्रामधील बीड जिल्हाचा रहिवासी आहे. सध्या तो पुण्यातील बालेवाडीतील एका खासगी कंपनीत काम करतो. सूत्रांनी दावा केला आहे की चेतन आणि सिया यांनी या तरूणाला केतनला रस्त्यातून हटवण्याचं केलेलं प्लॅनिंग सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्याला १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर देखील येण्यास सांगितलं होतं. मात्र तो त्यांच्यासोबत गेला नाही. पोलीस सध्या या दाव्याचा तपास करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात या तिसऱ्या व्यक्तीनं सिया आणि चेतनला असं करू नका अशा सल्ला दिला होता. आता तपास यंत्रणा चेतनच्या या मित्राला कोणत्या गोष्टी माहिती होत्या याची माहिती मिळवत आहेत. घटनेनंतर त्याचे आरोपींसोबत बोलणं झालं होतं का. सूत्रांच्या म्हणण्यानुसार केतनच्या मृत्यूनंतर चेतन पहिल्यांदा याच युवकाला भेटला होता. सियाने देखील याला संपर्क केला होता. पोलीस या दाव्याच्या पुष्टीसाठी कॉल रेकॉर्ड आणि डिजीटल चॅट हे पुरावे जुळवून पाहत आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ कोर्टात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लाय डिटेक्टर टेस्ट अर्थात पॉलीग्राफ टेस्ट करण्याची परवानगी मागितली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरोपींची सहमती मिळाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.