

पुणे: केतन अगरवालच्या खुनाचा पहिला प्रयत्न सिया गोयलने १४ जून रोजी केला होता. मात्र, त्यापूर्वी चार-पाच दिवस अगोदर केतनला लोहगडावरून ढकलून देऊन कसे ठार करायचे याची रंगीत तालीम (सराव) सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी एका ठिकाणी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे, एवढेच नाही तर केतनचा खून आपल्याला कोणकोणत्या प्रकारे करता येईल हे देखील या दोघांनी यू-टयूब आणि गुगलवर शोधले. शेवटी दोघांना लोहगडावरून त्याला दरीत ढकलून देण्याचा पर्याय सोपा वाटल्याने त्यांनी त्याप्रमाणे केतनला संपविले.
केतन अगरवाल याचा १८ जून रोजी लोहगडावरील दरीत ढकलून देऊन सिया आणि चेतन या दोघांनी खून केला. पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून, खून असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. २९ जूनपर्यंत दोघांना पोलिस कोठडी असून, सध्या ते लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या तपासात करत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
सियाने बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र, धाडस झाले नाही
केतनसोबतच्या लग्नाबाबत घरी बोलण्याचा प्रयत्न सियाने केला होता. परंतु तिला धाडस झाले नाही. केतन याचा खून कसा करायचा यावर सिया-चेतनचे दोघांचे एकमत झाल्यानंतर १४ जूनपूर्वी चार-पाच दिवस अगोदर दोघे एका ठिकाणी भेटले. अगोदरच त्यांनी लोहगडावरील ठिकाणांची माहिती घेतली होती. तसेच सिया यापूर्वी एकदा केतनसोबत लोहगडावर जाऊन आल्याने तिला थोडी-फार माहिती झाली होती. त्याच संदर्भाने या दोघांनी केतन याच्या खुनाची रंगीत तालीम केली. केतनसोबत ठरलेल्या ठिकाणी सिया कशी उभी राहणार? चेतन कोणत्या दिशेने येणार? केतन उभा असताना त्याला धक्का कसा मारायचा, याचा अक्षरशः सराव केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे केतनचा खून अतिशय शांत डोक्याने तयारी करून केला असल्याचे निदर्शनास येते.
खुनाचे पर्याय गुगल, यू-ट्यूबवर सर्च केले
केतनसोबतचे लग्न मोडण्याचा मार्ग सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर सिया आणि चेतन अधिक जवळ आले. १५ जूनपासूनच दोघांनी त्याला आपल्या मार्गातून कसे दूर करता येईल याची चाचपणी सुरू केली. त्यासाठी त्यांनी यू-ट्यूब आणि गुगलवर त्याचा खून कोणकोणत्या पद्धतीने करता येईल हे शोधून पाहिले. त्याला विष देऊन मारता येईल, कायमचे अपंग करता येईल किंवा त्याचा अपघात करता येईल का, हे देखील पडताळून पाहिले. शेवटी दोघांना केतन याला ट्रेकिंगची आवड असून, गडकिल्ले फिरण्याचा छंद असल्याचे लक्षात आले. त्यातून त्यांना लोहगडावरून त्याला ढकलून देऊन मारण्याचा पर्याय सोपा वाटला. ३१ मे रोजी पहिल्यांदा केतन हा सियाला लोहगडावर घेऊन गेला होता. तेव्हाच तिच्या मनात केतनचा खून येथे करता येईल हे आले होते. तिने चेतन चौधरी याला तसे बोलून देखील दाखविले होते.
..अशी रंगली चेतन-सियाची प्रेम कहानी
चेतन चौधरी आणि सिया गोयल यांची दिवाळीच्या एका कार्यक्रमात ओळख झाली होती. दोघांत सुरुवातीला मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मार्केटयार्डमध्ये क्रिकेटचे सामने होते. त्यावेळी काही लोकांच्या निदर्शनास सिया आणि चेतन यांचे संबंध आले होते. असे समजते की, सियाचा भाऊ साहील याला देखील या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती. विशाल अगरवाल याच्या चुलत मामाचा मुलगा नरेंद्र मित्तल यांच्या मार्फत केतन याच्यासाठी सियाचे स्थळ आले. नाते ठरल्यानंतर फेब्रवारीत त्यांचा साखरपुडा देखील झाला. परंतु सिया हिचे चेतनसोबत पूर्वीपासूनच प्रेमसंबंध होते. त्यानंतर देखील ती केतन याच्यासोबत लग्नास कशी तयार झाली हा मोठा सवाल आहे. लग्न ठरल्यानंतर सिया चेतनपासून काही दिवस दूर गेली. त्यावेळी तिने लग्नास होकार दिल्यानेच तिचे लग्न केतनसोबत ठरविण्यात आले होते. त्यानंतर परत ती चेतनसोबत बोलू लागली. आता तिला काही केल्याने केतनसोबत लग्न करायचे नव्हते. लग्न ठरून दोन महिन्यांचा कालावधी लोटला होता.