

पुणे: जागतिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झपाट्याने बदल होत असून, ते आत्मसात करण्यात विद्यार्थी पुढे असल्याचे दिसून येत आहे. याउलट महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या झालेल्या नेमणुका या १५ ते २० वर्षांपूर्वीच्या असून, बदलत्या तंत्रज्ञानाशी त्यांच्यापेक्षाही विद्यार्थीच पुढे असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची घटत असलेली पटसंख्या ही व्यवस्थापनाच्या दृष्टीने चिंताजनक बाब ठरत असल्याचे मत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. त्यामुळे काळानुरूप प्राध्यापकांनीही तंत्रज्ञान अवगत करण्यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या पुनरावलोकन तज्ज्ञ समितीवर शेखर गायकवाड यांच्यांसह माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्ताने ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, कृषी कॉलेजची माजी कृषी विद्यार्थी संघटना आणि महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या वतीने राज्याचे माजी कृषी संचालक डॉ. रामकृष्ण मुळे यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या डॉ. चिमा सभागृहात गायकवाड व दांगट यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी दिनकर जगदाळे यांच्यासह माजी फलोत्पादन संचालक डॉ. सुदाम अडसूळ, माजी साखर सह संचालक पांडुरंग शेळके, अजित चौगुले, ॲड. विपूल मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाचे १९०७ पासून ते सद्य:स्थितीवर आधारित ई-बुक ऑफ पूना ॲग्रिकल्चर कॉलेज आणि हॉल ऑफ फेमअंतर्गत यशस्वी १२५ ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांची थोडक्यात माहिती मुख्य इमारतीमध्ये इतिहासरूपाने ठेवण्यासाठीचे काम आम्ही हाती घेतले आहे.
उमाकांत दांगट म्हणाले, की आपली अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असून, आपण त्यात स्वयंपूर्ण झालो आहोत आणि ते आपले बलस्थान आहे. परंतु हे क्षेत्र दुर्लक्षित राहिल्याचा उल्लेख कोणीच करीत नाही. कोणत्याही गोष्टींमध्ये विश्वासार्हता महत्त्वाची असून, ते टिकवण्याचे खरे आव्हान आपल्यासमोर आहे. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशासाठीही ते महत्वाचे आहे. कारण युद्धजन्य स्थिती पाहता सुख, शांती, समाधान कसे मिळणार यावर विचारमंथन व्हायला हवे. मान्यवरांचे स्वागत डॉ. सुदाम अडसूळ यांनी केले. अनंत चोंदे पाटील यांनी आभार मानले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता : डॉ. मुळे
गायकवाड आणि दांगट यांनी कायमच शेती, शेतकरी आणि समाजासाठी योगदान दिलेले आहे. एमपीएससीच्या समितीवर नियुक्त झालेले हे दोघेही कृषी पदवीधर आहेत, ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. रामकृष्ण मुळे म्हणाले. तसेच राज्यात कृषी महाविद्यालयांची संख्या भरपूर असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.