केसरी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

केसरी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष, ढोल-ताशाचा निनाद, फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झालेले बाप्पा, लाडक्या बाप्पाला मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सरसावलेली तरुणाई, पारंपरिक पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त…अशा उत्साही वातावरणात टिळक पंचांगानुसार गणरायाचे रविवारी केसरीवाड्यात आगमन झाले.
केसरीवाडा गणपती मानाचा पाचवा गणपती आहे.

ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा असलेल्या या गणपतीची डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्रतिष्ठापना करण्यात आली. रमणबाग चौकातून सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. रमणबाग चौकातील महेश गोखले व विद्धेश गोखले यांच्याकडून 'श्रीं'ची मूर्ती घेण्यात आली. पालखीत बाप्पा विराजमान झाल्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष झाला. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरूवात झाली. रमणबाग चौकातून शिंदेपार चौकाच्या दिशेने मिरवणुक वाजत-गाजत मार्गस्थ झाली.

श्रीराम आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचे वादन झाले. कोसळणार्‍या पावसाच्या हलक्या सरींमुळे ढोल-ताशा पथकातील वादकांत उत्साह संचारला होता. ओंकारेश्वर मंदिर चौक, वर्तक उद्यान, नारायणपेठ पोलिस चौकी आणि केळकर मार्गाने मिरवणूक केसरीवाड्यात आली. टिळकवाड्यातील गणेश मंदिरासमोर अभिनव कलाभारतीतर्फे आकर्षक रांगोळी साकारली होती. 'श्रीं'चे टिळकवाड्यात आगमन होताच गणेशभक्तांनी 'बाप्पा मोरया'चा जयघोष केला. डॉ. प्रणती टिळक यांनी गणरायाचे औक्षण केले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदिपसिंग गील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक, रौनक टिळक, कृतिका टिळक आदी उपस्थित होते. प्रतिष्ठापनेच्या वेळी कौस्तुभ खळीकर यांनी पौरोहित्य केले. केसरी गणेशोत्सवात 24 ते 28 ऑगस्टपर्यंत रोज सायंकाळी 6.30 वाजता कार्यक्रम असणार आहेत. सर्व कार्यक्रम केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात होणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news