

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्पालगतची विकसकांना दिलेली जागा पीएमआरडीएने शिवजयंती साजरी करण्यासाठी उपलब्ध करुन द्यावी. या जागेच्या ऐवजी सर्व पर्यायांचा विचार करुन दुसरी पर्यायी जागा विकसकाला द्यावी. त्यासाठी सकारात्मक तोडगा काढावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांना दिले आहेत.
निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पालगतच्या पीएमआरडीएच्या जागेची विक्री प्रक्रिया रद्द करून ही जागा शिवजयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव आणि इतर सर्व सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी शिवजयंती समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती समितीच्या वतीने थेरगाव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. त्या प्रसंगी शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार्या शिष्टमंडळात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवचे अध्यक्ष संजय ससाणे, काँग्रेस पक्षाचे नरेंद्र बनसोडे, शिवसेना ठाकरे गटाचे युवराज कोकाटे, कष्टकर्यांचे नेते काशिनाथ नखाते, शिवाजी साळवे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, छावा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी यळकर-पाटील, संभाजी बि—गेडचे अध्यक्ष सतीश काळे, भाऊसाहेब अडागळे यांचा सहभाग होता.
हेही वाचा