अखेर कल्याण-नगर महामार्गावर गतिरोधक पट्ट्या अवतरल्या | पुढारी

अखेर कल्याण-नगर महामार्गावर गतिरोधक पट्ट्या अवतरल्या

ओतूर : पुढारी वृत्तसेवा:  नगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर ओतूर येथील मोनिका चौक, खामुंडी व महामार्गालगतच्या शाळा, महाविद्यालये अशा महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक पांढर्‍या पट्ट्या बसविण्यात आल्या. यामुळे प्रवाशीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत दैनिक ’पुढारी’ने वेळोवेळी वार्तांकन करून वाचा फोडली होती. दोन वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण झाले. ओतूरचा संपूर्ण परिसर झपाट्याने शहरीकरणाकडे झेपावला असताना मुंबईकडे जाणारा हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग अपघातांचे आक्राळविक्राळ रूप धारण करत होता.

ओतूर कॉलेज, कोळमाथा, एस टी बसस्थानक, मोनिका चौक,अहीनवेवाडी फाटा ही अपघातांची प्रमुख केंद्र बनली आहेत. दि 1 रोजी रात्री 9 वा.30 मि.च्यादरम्यान कार व ट्रकचा मोनिका चौक येथे अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नव्हती. मात्र, तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कल्याण-नगर महामार्गावर आवश्यक तेथे सूचना फलक, स्पीड ब—ेकर बसवणे गरजेचे आहे. रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहनांचा वेग वाढला. मात्र, वेगावर नियंत्रण आणणा-या उपायांचा अभाव बघायला मिळत असल्याची बातमी दैनिक ’पुढारी’तून 3 जूनला प्रसिद्ध केली होती.

याबाबत ओतूर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय सचिन कांडगे यांनीही पाठपुरावा केला. राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुरुस्तीचे जितेंद्रसिंग ग्रुप या कंपनीचे व्यवस्थापक सतीश बागल व दीपक गुंजाळ यांना महामार्गावरील उणिवा निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी तत्काळ निर्णय घेत महामार्गावर आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी पांढर्‍या पट्ट्याचे, गतिरोधकाचे काम पूर्ण केले. कामाबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

नगर-कल्याण महामार्गावर ओतूर कॉलेज, कोळमाथा, एस टी बसस्थानक, अहीनवेवाडी फाटा, खामुंडी या संपूर्ण परिसरात रस्ता दुभाजक, स्पीड ब—ेकर, सूचना फलक, सिग्नल अत्यंत गरजेचे आहेत. मोनिका चौकात एका सर्कलची निर्मिती केल्यास संभाव्य अपघातांना टाळता येऊ शकते.
                                                                   – आशिष शहा, ग्रामपंचायत सदस्य.

 

Back to top button