पुणे: लोहगाव विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असून, त्यामुळे पक्ष्यांचा वावर वाढला आहे. याचा त्रास विमानांच्या उड्डाण व लँडिंगवेळी होतो आहे. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यांनी संबंधित अधिकार्यांना तातडीने स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. येथील अनेक खासगी मोकळ्या जागांवर कचरा आणि राडारोडा टाकलेला आहे. अशा जागांच्या मालकांना महापालिकेने सात दिवसांची नोटीस देत स्वच्छतेचे आदेश दिले आहेत. जर यानंतरही स्वच्छता न झाल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत या जागा ताब्यात घेण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Latest Pune News)
लोहगाव विमानतळावरून विमानांचे उड्डाण करताना पक्ष्यांचा तसेच भटक्या श्वानांचा अडथळा निर्माण होत असल्याचे काही प्रकार घडले होते. धावपट्टीवर विमान उतरविताना अचानकपणे भटके श्वान आल्याने काही दिवसांपूर्वी विमान पाऊण तास हवेतच थांबवावे लागले होते. तसेच अनेकदा पक्ष्यांचाही त्रास वाढत असल्याने अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त, विमानतळ प्राधिकरण तसेच हवाई दलातील अधिकार्यांची बैठक नुकतीच घेतली होती. या बैठकीत विमानतळ परिसरातील मोकळ्या जागांवर कचरा टाकला जातो.
तसेच वाघोली येथील भाजी मंडई भागातील कचरा उचलला जात नाही. हडपसर कचरा रॅम्प येथे पडलेला कचरा हा पक्ष्यांची संख्या वाढण्यास कारणीभूत असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली होती. त्यावेळी येथे आवश्यक ती स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या पाहणी प्रसंगी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त एम. जे. पंद्रन, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप, संदीप कदम, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, प्रशांत ठोंबरे आणि विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी जागेवर जाऊन स्वच्छतेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
या वेळी परिसरातील जागामालकांनी सात दिवसांत स्वच्छता न केल्यास महापालिकेकडून त्या जागा ताब्यात घेण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणार्या जागांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
वाघोलीत विशेष स्वच्छता मोहीम
वाघोलीतील भाजी मंडईसह परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये, यासाठी लक्ष ठेवले जाणार असून, गरज पडल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. कटक मंडळाच्या हद्दीतील काही प्रकल्पांमध्ये उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे लक्षात आले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी 21 जुलै रोजी महापालिका व कटक मंडळातील अधिकार्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे.