

Monsoon becomes active again in Maharashtra
पुणे: गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळत असून, यामुळे चिंतेत असलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने 20 ते 25 जुलैदरम्यान राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवेचा दाब कमी झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, सर्वाधिक जोर कोकण आणि विदर्भात राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Pune News)
ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी
ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस) : 22 आणि 23 जुलै रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातार्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यलो अलर्ट (मध्यम पाऊस) : पालघर, ठाणे, पुणे घाट, लातूर, धाराशिव, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह सर्व जिल्ह्यांमध्ये 20 ते 25 जुलैदरम्यान विविध दिवशी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याउलट, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहून केवळ हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.