

आळेफाटा: आळेफाटा वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील घरफोडी चोरीचा तपास लावण्यात आळेफाटा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांना यश आले आहे. याप्रकरणी पाच जणांचा अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चांदीचे दागिने व वाहन असा 12 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. यातील पाच जण फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.
सोमनाथ भीमनाथ बामणे (वय 37 रा गुणवंतवाडी, ता शिरूर पुणे) संदीप कैलास भालेराव (वय 28 राह सुरेगाव ता नेवासा जि अहिल्यानगर) संदीप बबन धोत्रे (वय 37 रा न्हावरा ता शिरूर पुणे) श्रीमंत जिवलाल चव्हाण (वय 52 रा देऊळगाव सिद्धी जि अहिल्यानगर) आकाश लकड्या भोसले (वय 19 रा शिरूर जि पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Latest Pune News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि 6) पहाटे चोरट्यांनी आळेफाटा परिसरातील चेतन रमेश चौगुले यांचे घर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले यांचा बंगला येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत. रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने व देवपूजेची भांडी असा साडेसात लाखांच्यावर ऐवज घेऊन पोबारा केला होता. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
या चोरीचा तपास आळेफाटा पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या वतीने सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीगार यांच्या माहितीनुसार सदरच्या चो-या करतेवेळी चोरट्यांनी पिकअप वाहनाचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकांनी शिरूर येथून हे पिकअप वाहन ताब्यात घेत चोरी प्रकरणातील पाच जणांना शिरूर व अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
त्यांनी इतर पाच जणांनासह चोरी केल्याची कबुली दिली. वाहनासह चांदीची भांडी असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, अनिल पवार ,सहाय्यक फौजदार दीपक साबळे ,पोलीस हवालदार अमित माळुंजे, पंकज पारखे, विनोद गायकवाड, नवीन आरगडे, शैलेश वाघमारे, ओमकार खुणे, गणेश जगताप, अक्षय नवले, अमोल शेडगे, हेमंत विरोळे, धीरज जाधव, वैभव सावंत यांनी केली.