

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव येथील लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील लवंगारे हॉस्पिटलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन विठ्ठल गुजर (उपजिल्हा रुग्णालय, दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी डॉ. स्वाती लवंगारे (रा. केडगाव, ता. दौंड) आणि डॉ. तुकाराम यशवंत मोटे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, डॉ. स्वाती लवंगारे या स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही आणि त्यांना गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसतानाही गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा करून अवैधरित्या गर्भपात करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच डॉ. तुकाराम मोटे यांच्या नावाने आणि सहीने गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना देण्यात आल्याची नोंद आढळून आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा क्रमांक ५७९/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अजय मोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघज करीत आहेत.