Murder Attempt: कात्रजात तरुणावर कोयत्याने हल्ला; एक अटक, दोन अल्पवयीन ताब्यात!
पुणे: मोटारीला दुचाकीने धडक दिल्याने विचारणा करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. या वेळी टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, एकाला अटक केली आहे. अक्षय दत्तात्रय बांदल (वय २६, रा. सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. (Latest Pune News)
मृणाल दीपक जाधव (वय १९, रा. राज टाॅवर, भाजी मंडई, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत बांदल याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बांदल, त्याचा भाऊ आणि मित्र मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर एका काॅफी शाॅपसमोर रविवारी (२ नोव्हेंबर) गप्पा मारत थांबले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी जाधव आणि त्याच्याबरोबर असलेले दोन अल्पवयीन दुचाकीवरून तेथे आले. बांदल याने काॅफी शाॅपसमोर मोटार लावली होती.
दुचाकीने मोटारीला धडक दिली. त्यामुळे बांदल याने आराेपी जाधव आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना विचारणा केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी जाधव आणि साथीदारांनी बांदल यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांचा भाऊ आणि मित्रांना शिवीगाळ केली. काॅफी शाॅपसमोर कोयता उगारून दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या जाधव याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.

