

पुणे : हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका पादचारी ज्येष्ठाला मारहाण करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची साेनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी एका ७५ वर्षीय ज्येष्ठाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी ज्येष्ठ नागरिक हे रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका सोसायटीत राहायला आहेत. ते १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडले असता मधुबन सोसायटी रस्त्यावर चौघांनी त्यांना अडवले. त्यांना धक्काबुक्की करून चोरट्यांनी गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली.
पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना चोरट्यांकडून टार्गेट केल्याचे दिसून येते. प्रामुख्याने ज्येष्ठाकडील ऐवज हिसकावून चोरटे पोबारा करीत आहेत.