कात्रज-कोंढवा ग्रेड सेप्रेटरचे काम धिम्या गतीने; निधी अनुपलब्ध

कात्रज-कोंढवा ग्रेड सेप्रेटरचे काम धिम्या गतीने; निधी अनुपलब्ध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कान्हा हॉटेल चौकामधील ग्रेड सेप्रेटरचे (भुयारी रस्ता) काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र, हे काम धिम्या गतीने सुरू असल्याने चार महिन्यानंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. दुसरीकडे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी शासनाकडून मिळणारा 200 कोटींचा निधी घोषणा होऊन दोन वर्षे उलटूनही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या रस्त्यावरील कोंडीतून नागरिकांना केव्हा दिलासा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कात्रज-कोंढवा हा 84 मीटर रुंदीचा मूळ रस्ता विकास आराखड्यात दाखवण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाला महापालिकेने 31 ऑक्टोबर 2018 रोजी मंजुरी दिली. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक ते पिसोळी महापालिका हद्दीपर्यंत जातो. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरी या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्यापुढील काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. मूळ प्रस्तावानुसार या रस्त्याच्या भूसंपादनासाठी 710 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने महापालिकेने रस्त्याची रुंदी 84 ऐवजी 50 मीटर करण्याचा निर्णय घेतला.

या रस्त्यावरील कान्हा हॉटेल चौकातील भुयारी रस्त्याचे (ग्रेड सेप्रेटर) काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून स्लॅब टाकावा लागणार असल्याने येथील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. ग्रेड सेप्रेटरचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते. मात्र, काम धिम्या गतीने सुरू असल्याने चार महिन्यांनंतरही हे काम पूर्ण होऊ शकले नाही.

दरम्यान, रुंदी कमी केल्यानंतर भूसंपादनासाठी 280 कोटी रुपयांची गरज आहे. त्यापैकी 200 कोटी राज्य सरकार देईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये केली होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news