

राजेंद्र गलांडे
बारामती: केवळ राज्यातच नव्हे, तर देशात बारामती शहर आणि तालुक्याचा नावलौकिक आहे तो येथील विकासकामांमुळे. बारामतीला आज ‘विकासाचे रोल मॉडेल’ म्हटले जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गेल्या 30-35 वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले प्रयत्न यासाठी कारणीभूत ठरले. त्यामुळेच आजच्या बदलत्या बारामतीचे सर्व श्रेय अजितदादा यांच्याकडे जाते. बुधवारी त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे बारामतीकर आता सुन्न झाले असून, अश्रूंचा हुंदका दाटला आहे. अनेक घरांत बुधवारी चुली पेटल्या नाहीत. विकासाची प्रक्रिया निरंतर चालणारी असते, असे म्हटले जाते. परंतु, या प्रक्रियेला गती देणारा नेता त्या तालुक्याला लाभावा लागतो; अन्यथा विकासाचा दुष्काळ जनतेच्या वाट्याला येतो. बारामतीने हा दुष्काळ जवळून अनुभवला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजितदादांकडे बारामतीच्या राजकारणाची जबाबदारी दिली. तेव्हापासून अजितदादांनी मागे वळून पाहिले नाही. बारामतीच्या सुदैवाने गेल्या तीन-चार दशकांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच लोकप्रतिनिधी राहिले. त्याचा परिणाम शहर व तालुक्याच्या विकासावर झाला. आज राज्यात, देशात विकसित शहर म्हणून बारामतीचा उल्लेख केला जातो. त्यामागे अजितदादा यांचे प्रचंड कष्ट व मेहनत आहे, हे सर्व बारामतीकर, अगदी त्यांचे विरोधकसुद्धा मान्य करतात. बांधकाम क्षेत्रात तर एखाद्या अभियंत्याला लाजवेल असा त्यांचा अभ्यास असायचा. त्यामुळे बारामतीत विकासकामे उभी राहत असताना ती योग्यरीतीने होत आहेत का, याची खातरजमा ते दर आठवड्याला बारामतीत करायचे. भल्या पहाटे बारामतीकर झोपेत असताना अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दादांचे दौरे ठरलेले असायचे. कुठे काही चुकीचे दिसले की ते तिथेच अधिकारी-ठेकेदारांना सूचना द्यायचे. एखादे काम आवडले नाही तर ते पाडून टाकून दुरुस्त करायला सांगायचे. एखाद्या अभियंत्याला, वास्तुविशारदालासुद्धा त्यांच्यासमोर उभे राहताना अनेकदा विचार करावा लागायचा. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच बारामतीचा चेहरामोहरा बदलणे शक्य झाले आहे. अजितदादांच्या दूरदृष्टीमुळेच बारामतीची ओळख आज स्मार्ट सिटी म्हणून झाली आहे. बारामती शहरात तालुकास्तरावर अजितदादांमुळे भव्य-दिव्य प्रकल्प मार्गी लागू शकले. सरकारी कार्यालयांच्या इमारती कॉर्पोरेट लूकमध्ये गेल्या.
बारामतीजवळ शिवसृष्टीचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. राज्यातच नव्हे तर देशातही अशा पद्धतीचा प्रकल्प नसेल अशी रचना त्यांनी केली. वन विभागाकडून बारामतीत वन उद्यान आकाराला येत आहे. त्याच्या कामासाठी अजितदादा यांनी मोठा निधी दिला. कामाचा आराखडा कसा असावा, त्यातील बारकाव्यासह अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. परिणामी, एकेकाळी ’दुष्काळी तालुका’ अशी ओळख असलेल्या बारामती तालुक्याचा आता पर्यटनाच्या दृष्टीने विचार होऊ लागला होता. बारामती शहरात कऱ्हा नदीचे सुशोभीकरण, बाजूने उभी केलेली संरक्षक भिंत, निरा डावा कालव्याचे झालेले सुशोभीकरण, नटराज नाट्य कला मंदिर, लगत उभा राहिलेला टॉवर क्लॉक पार्क, साठवण तलावाजवळ सनसेट व्ह्यू लेक, कन्हेरीची शिवसृष्टी आणि वन उद्यान, बारामतीतील श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचे झालेले नूतनीकरण, कविवर्य मोरोपंत नाट्यगृहाचे झालेले नूतनीकरण, भिगवण रस्त्याचे केलेले सुशोभीकरण, विद्या प्रतिष्ठानजवळ उभारलेला हॅप्पी स्ट्रीट, बारामती शहरात प्रशासकीय भवनाशेजारी बगिचाचे काम, बारामतीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेडदमधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामतीतील प्रशासकीय भवन, बऱ्हाणपूरचे पोलिस उपमुख्यालय, बारामतीतील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, वाहतूक विभाग पोलिसांचे कार्यालय, शहर पोलिस ठाणे, माळेगाव पोलिस ठाणे, सुपे पोलिस ठाण्याच्या इमारती, गावोगावी उभ्या राहिलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या इमारती, तलाठी कार्यालये, ग््राामसचिवालये ही दादांच्या कामाची साक्ष आहे.
शहराचा विकास करीत असताना तालुक्यातील देवस्थानांचा विकास अजितदादा यांनी हाती घेतला. सोमेश्वर, मोरगाव, सोनेश्वर आदी मंदिरांचा कायापालट करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न बारामतीतच सुटावेत, येथेच त्यांना मोठ्या शहरात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अजितदादा यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांतूनच बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालय उभे राहिले. या रुग्णालयाची इमारत पाहिली तरी एखाद्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणच्या रुग्णालयातसुद्धा नसेल याची प्रचिती येते. दुर्दैवाने दादांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे पार्थिव इथेच दाखल करावे लागले.
मेडद येथे नव्याने उभे राहत असलेले शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, सोमेश्वरनगरला होत असलेले 100 खाटांचे रुग्णालय, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा त्यांनी कायापालट केला. बारामती तालुक्याचा 60 टक्के भाग तसा जिरायती. यासाठी त्यांनी एक हजार कोटी रुपयांचा निरा-कऱ्हा जोड प्रकल्प हाती घेतला होता. 450 कोटी रुपये निधीची तरतूद करीत जनाई-शिरसाईचे पाणी बंद पाइपमधून देण्याचा धाडसी निर्णय त्यांनीच घेतला. पुरंदर उपसाचे पाणी तालुक्याला मिळवून दिले. एकीकडे ही कामे सुरू असताना दुसरीकडे पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या ओढे-नाले, चाऱ्या पुनर्जीवित करण्याचे काम अजितदादा यांच्या नेतृत्वात झाले. जलसंधारणाच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी त्यांनी दिला.
त्यातून गाळ काढणे, ओढे-नाले रुंदावणे अशी अनेक कामे झाली. त्यातून पाणीसाठा वाढू लागला असून, दुष्काळ हा शब्द मागे पडू लागला होता. तालुक्यात गावोगावी रस्त्यांचे मजबूत जाळे त्यांच्याच नेतृत्वात उभे राहिले. निरा-बारामती रस्त्याचे रुंदीकरण, या रस्त्यावरील पूर्वीचे पूल हटवत उभे केलेले नवीन मोठे पूल, माळेगाव ते बारामती रस्त्याचे केलेले रुंदीकरण, पणदरे ते कोऱ्हाळे आणि पुढे कोऱ्हाळे ते सोमेश्वरनगर रस्त्याचे रुंदीकरण त्यांनी केले. पालखी महामार्गाची कामे मार्गी लावली. शहराच्या बाजूने सुरू असलेले रिंगरोड, दौंड-बारामती-फलटण या रस्त्याचे सुरू असलेले कॉंक्रिटीकरण, शिरूर-सुपा ते सांगवी या मार्गाचे सुरू असलेले कॉंक्रिटीकरण, अशी मोठमोठी कामे सध्या तालुक्यात त्यांच्या नेतृत्वात सुरू होती. आता दादांच्या एक्झिटमुळे या प्रक्रियेला मोठा बेक लागला आहे.
शैक्षणिक हब म्हणून बारामतीची ओळख गेल्या काही दशकांत झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा-महाविद्यालयांच्या तीन-चार मजली इमारती उभ्या राहिल्या, ते दादांनी विविध मार्गांनी दिलेल्या निधीमुळे शक्य झाले. जिथे शासकीय निधी कमी पडू लागतो तिथे अजितदादा यांनी उद्योजकांकडून, कंपन्यांकडून सीएसआर फंड आणला. या निधीतून अनेक शाळा-महाविद्यालयांत स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत, सुसज्ज प्रयोगशाळा, व्यायामशाळेसाठी आवश्यक साहित्य अशी अनेक कामे उभी राहिली.
अजितदादा यांनी जाणीवपूर्वक केलेल्या कामांमुळेच आज बारामतीच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. प्रसंगी एखादे पाऊल मागे घेत आवश्यक तेथे राजकीय तडजोडी त्यांनी केल्या. संस्था अडचणीत असेल तर ती सुस्थितीत यावी, यासाठी त्यांनी अशा तडजोडी केल्या. त्यांच्या नेतृत्वात बारामती सहकारी बॅंकेने नेत्रदीपक प्रगती केली. माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतल्यावर अनेक कामांचा धडाका लावला होता. ’सोमेश्वर’ला राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांच्या यादीत नेऊन बसविले.
देश असो की विदेश, कुठेही बारामतीकरांना अडचण येवो, त्यावरील हमखास इलाज म्हणून दादांकडे बघितले जायचे. त्यांच्या कार्यालयाकडे एखादा फोन केला, तरी अडचणीत देखील मदत मिळायची. रुग्णसेवेसाठी तर ते सदैव तत्पर असायचे. स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा हे त्यांचे गुण तरुणाईला भावायचे. त्यामुळे तरुणाई त्यांच्या कामावर नेहमीच खूष असायची. ज्येष्ठ मंडळीसुद्धा हे काम अजितदादांनीच करू जाणे, असे म्हणायचे. त्यांच्या अपघाती निधनामुळे बारामती पोरकी झाली असून, भविष्यच अंधकारमय झाले आहे.