

भामा आसखेड: सह्याद्रीच्या जंगलात आढळणारे काटेसावर हे झाड केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठी नव्हे, तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी देखील प्रसिद्ध आहे. या झाडाला सध्याच्या वसंत ऋतूत लाल भडक रंगाची आकर्षक फुले लगडल्याने खेड तालुक्यातील जंगलाचे निसर्गसौंदर्य खुलले आहे.
खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचा आणि घनदाट वनसंपदेचा आहे. तीव उन्हाळ्यात काही झाडांची पानगळ झाल्याने पानाविना झाडे बोडकी दिसतात, तर काही झाडांची उन्हाळ्यात पानगळ होत नसून काही झाडांना अनेक रंगांची फुले लगडतात. यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिक फुललेले दिसते. तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: वांद्रा, भलवडी, आंबोली,आंभु, कोहिंडे खुर्द, गडद, तोरणे खुर्द, घोटवडी, भोरगिरी, वाडा, शिरगांव, कोळीये, अखतुली, वेल्हावळे, नायफड, डेहणे, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी तालुक्यातील गावच्या परिसरात काटेसावर झाड लाल रंगाच्या फुलांनी लगडल्याने या फुलांमुळे निसर्गाचे सौंदर्य खुललेले दिसत आहे.
काटेसावर झाडाच्या खोडावर काटे असतात, त्यामुळे या झाडाला काटेसावर असे नाव पडले आहे. या झाडाला वैज्ञानिक नाव बॉम्बॅक्स सिबा आणि आर्यवेदात याला शाल्मली तर इंग््राजीत याला रेड सिल्क कॉटन ट्री म्हणतात. हे झाड साधारण 40 मीटर पर्यंत उंच वाढते. तालुक्याचे अनेक भागात विशेषतः पश्चिम भागात हे झाड मोठ्या प्रमाणात आढळते. वसंत ऋतूत या झाडाची पाने गळण्यापूर्वी त्याला लाल फुले येतात.
या झाडाच्या लाल भडक फुलांमुळे जंगलात एक आकर्षक दृश्य निर्माण होऊन जंगल भटकंती करणाऱ्या पर्यटकांच्या मनाला या फुलांची भुरळ पडते. नैसर्गिक सौंदर्य फुलविण्यासाठी आणि औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असल्याने आयुर्वेद व पारंपरिक औषधांमध्ये या झाडाचा वापर होत आहे. पर्यावरणाचे दृष्टीने हे झाड महत्वाचे देखील आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या जंगलात हे झाड संरक्षित करणे गरजेचे आहे.
मानवासाठी झाडाचे औषधी गुणधर्म
काटेसावर झाडाचे विविध भाग उदा साल, फुले, मुळे, गोंद, पाने आणि फळे हे औषधी गुणधर्मांनी भरलेले आहेत.आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी चिकित्सा पद्धतींमध्ये याचा वापर होतो. लाल फुले हे झाडाचे वैशिष्ट्य आहेत. ही फुले फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, लोह, सोडियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमने समृद्ध असतात. फुलांचा वापर त्वचेवरील मुरूम डाग घालविण्यासाठी व सूज कमी करण्यासाठी होतो. कर्करोगविरोधी, अँटी-अल्सर आणि मधुमेह नियंत्रणासाठी देखील होतो. अतिसार, जळजळ यावर देखील उपाय आहे. झाडाची तरुण मुळे खोकला, मूत्रमार्गाच्या तक्रारी, अतिसारातील पोटदुखी आणि नपुंसकतेवर उपचार करतात.