Kashish Methwani
पुणे : 'मिस इंटरनॅशनल इंडिया'चा किताब पटकावणारी आणि वैज्ञानिक होण्याचं स्वप्न पाहणारी पुण्यातील कशिष मेथवानी आता भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून रुजू झाली आहे. एकाच वेळी अनेक क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कशिषचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. (Success Story)
कशिश मेथवानी ही फक्त एकच पर्याय स्वीकारणारी नव्हती. तिला आयुष्यात 'एकतर हे किंवा ते' असा पर्याय नको होता. “मला मिस इंडिया व्हायचं होतं, वैज्ञानिक व्हायचं होतं आणि अधिकारीदेखील व्हायचं होतं. मला एक क्षेत्र निवडायचं नव्हतं. सर्व क्षेत्रात प्रयत्न करून उत्कृष्ट कामगिरी करायची होती. तेच मी निवडलं आणि तेच मी केलं,” असं कशिशने तिच्या व्याख्यानात सांगितलं होतं.
कशिषने 'मिस इंटरनॅशनल इंडिया २०२३' हा किताब जिंकला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून तिने एम.एस्सी.ची पदवी घेतली आहे. तसेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरू येथे तिने न्यूरोसायन्समध्ये संशोधन केले आहे. हे सर्व करत असतानाच तिने संरक्षण दलांच्या 'कंबाइंड डिफेन्स सर्विसेस (CDS)' परीक्षेत देशभरातून दुसरा क्रमांक मिळवला. या यशानंतर चेन्नई येथील 'ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी'मध्ये तिची निवड झाली.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ६ सप्टेंबर रोजी झालेल्या Passing Out Parade नंतर कशिषची 'आर्मी एअर डिफेन्स (AAD)' मध्ये लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली आहे. हे एक असे दल आहे, जिथे अतिशय अचूकता, तांत्रिक कौशल्य आणि दबावाखाली काम करण्याचे धैर्य आवश्यक असते. विशेष म्हणजे, हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी करण्याची संधी असतानाही तिने सैन्यदलाची निवड केली. 'एक सौंदर्यवती' आणि 'एक सैनिक' या दोन्ही भूमिका तिने यशस्वीपणे साकारल्या आहेत.
कशिषची आई शोभा मेथवानी सांगतात की, लहानपणापासूनच तिला सर्व गोष्टींमध्ये भाग घेण्याची आवड होती. तिने 'नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)' मध्येही भाग घेतला. NCC च्या शिस्तीने आणि कठोर प्रशिक्षणामुळे तिच्यात नेतृत्व आणि वेळेचे व्यवस्थापन असे गुण विकसित झाले. आधी ती न्यूरोसर्जन होण्याबद्दल बोलायची. पण NCC मध्ये सामील झाल्यानंतर आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीला गेल्यानंतर, तिने सैन्यात सामील होण्याचा गंभीरपणे विचार सुरू केला. २०२१ साली प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'ऑल इंडिया बेस्ट कॅडेट ट्रॉफी'चा सन्मान मिळाला होता. कशिषने केवळ सौंदर्य आणि शिक्षण या क्षेत्रांतच नाही, तर राष्ट्रीय स्तरावर पिस्तूल नेमबाजी, बास्केटबॉल, तबला वादन आणि भरतनाट्यम नृत्य यामध्येही प्रावीण्य मिळवले आहे. तसेच, 'क्रिटिकल कॉज' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून ती अवयव दान आणि प्लाझ्मा दानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करते. कशिष मेथवानीच्या या प्रवासातून हेच दिसून येते की, जर ध्येय निश्चित असेल आणि कठोर मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
ही सर्व कामगिरी तिने वयाच्या २४ व्या वर्षात केली आहे. कशिषची हॉवर्ड विद्यापीठात पीएचडीसाठी निवड झाली होती, पण तिने त्याऐवजी भारतीय सैन्य निवडले. तिने सौंदर्यवतीचे ग्लॅमरस जग सोडून एका सैनिकाचे वेगळे जग स्वीकारले आहे. आज तिचे लांब केस कापले आहेत आणि ती एका अधिकाऱ्याप्रमाणे वावरते.
कशिषच्या मते, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवण्याचे रहस्य हे आहे की, "तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्हाला कशामुळे आनंद मिळतो, तुमची आवड कशात आहे, हे शोधले पाहिजे." ती म्हणते, "तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींवर करिअर घडवले पाहिजे, जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदाने कामावर जाल. जेव्हा तुम्हाला तुमचे काम आवडते, तेव्हा तुमच्या मार्गात काहीही अडथळे आले तरी तुम्ही पुढे ढकलून द्याल आणि त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न कराल. पण तुमचे क्षेत्र शोधणे ही फक्त पहिली पायरी आहे."
कशिष ही तिच्या कुटुंबातील पहिली महिला अधिकारी आहे. तिच्या कुटुंबात कोणाचाही सैनिकी पेशा नाही. तिचे वडील डॉ. गुरमुख दास, संरक्षण मंत्रालयाच्या DGQA (डायरेक्टर जनरल क्वालिटी ॲश्युरन्स) मधून संचालक म्हणून निवृत्त झालेले वैज्ञानिक आहेत. आई शोभा मेथवानी या आर्मी पब्लिक स्कूल, घोरपडी येथे शिक्षिका आहेत. तिची बहीण शगुफ्ता एक अभियंता आहे, दोघीही आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी. बहीण शगुफ्ताने सोशल मीडियावर पोस्ट केले, "तिला पाहणे हा एक भावनिक क्षण होता. जरी तिने लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट कामगिरी केली असली, तरी तिने आपल्या स्वप्नांसाठी अनेक अडचणींशी संघर्ष केला आहे."
प्रत्येक अपयशानंतर ती पुन्हा उभी राहीली. आमच्या घरात शिक्षणाचे वातावरण होते. आमच्या घरात टीव्ही आहे, पण आम्ही तो जास्त पाहत नाही. कशिष नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभ्यासात व्यस्त असायची. ती अनेक गोष्टी करत होती आणि वेळेचे उत्तम व्यवस्थापन करत होती," असे तिची आई शोभा सांगतात. कशिषने मुरुमांची समस्या, शरीराच्या समस्या, इम्पोस्टर्स सिंड्रोम आणि अनेक अपयशांचा सामना केल्याचेही त्या सांगतात. (Success Story)