

पुणे : खून प्रकरणातील आरोपी पोलिसांना धक्का देऊन पसार झाल्याची घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मी विहार अपार्टमेंट, रोकडोबा मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता ) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्या प्रकरणी वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई श्रीकांत किरवले (वय २९) यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरीतील तरुणाचा महाबळेश्वरला फिरायला नेण्याच्या बहाण्याने मित्रांनीच ताम्हिणी घाटात खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आदित्य गणेश भगत (वय २२, रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. चोबे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मीविहार अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), तुषार ऊर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) यांना अटक केली होती.
त्यांच्याविरुद्ध रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी बाणेर परिसरातून वाघमारे आणि साथीदार पाटोळे यांना अटक करण्यात आली. मित्राची चोरलेली मोटार विकण्याच्या प्रयत्नात आरोपी होते. बाणेर पोलिसांनी वाघमारे आणि पाटोळे यांना माणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर माणगाव पोलिसांचे पथक वाघमारेला घेऊन तपासासाठी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात बुधवारी (दि. १४ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आले. पोलिसांनी घराचा पंचनामा केला. वाघमारे पोलिसांच्या ताब्यात होता.
पोलिस शिपाई किरवले यांना धक्का देऊन वाघमारे पसार झाला. त्यानंतर माणगाव पोलिसांनी या घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना दिली. पसार झालेल्या वाघमारेचा शोध घेण्यात येत असून, पोलिस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.