

पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीने 2024 च्या भारतीय वनसेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत कनिका अनभ या विद्यार्थिनीने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे.
ही परीक्षा 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. 21 एप्रिल ते 2 मे दरम्यान मुलाखत घेण्यात आली. विविध श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी एकूण 143 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. (Latest Pune News)
उमेदवारांना आपला निकाल आयोगाच्या https://upsc. gov in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. तथापि, निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यावर्षी, 40 सामान्य उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 19 उमेदवार, इतर मागासवर्गीय वर्गातील 50 उमेदवार, अनुसूचित जातीतील 23 उमेदवार आणि अनुसूचित जमातीतील 11 उमेदवार निवडण्यात आले आहेत. उमेदवार नसल्याने दिव्यांगांसाठी सध्याच्या दोन रिक्त जागा पुढील भरती वर्षात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.
उमेदवारांच्या नियुक्त्या सरकारकडून उपलब्ध असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार आणि परीक्षा व पडताळणीच्या नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व विहित पात्रता अटी/तरतुदी पूर्ण करणार्या उमेदवारांच्या अधीन राहून केल्या जातील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
यूपीएससीने त्यांच्या कॅम्पसमधील परीक्षा हॉल इमारतीजवळ एक सुविधा काउंटर उपलब्ध करून दिले आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा किंवा भरतीसंदर्भातील कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटून किंवा 011-23385271 / 23381125 या दूरध्वनी क्रमांकावर मिळवू शकणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.