पुणे: पुण्यात आपत्ती निवारण करण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत सर्व यंत्रणात समन्वय ठेवून तातडीने बचावकार्य राबविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक विभागीय आयुक्तांनी घेतली होती. यात महापालिका, पोलिस, महावितरण, एनडीआरएफसह शासनाच्या विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
मात्र, मंगळवारी (दि. 20) झालेल्या पावसामुळे शहरात या यंत्रणेत समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भरपावसात पालिकेची यंत्रणा कार्यरत दिसली असून, इतर यंत्रणा गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भविष्यात सर्व यंत्रणांसोबत समन्वय वाढविण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून बुधवारी (दि. 21) स्पष्ट करण्यात आले. (Latest Pune News)
पुण्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी सातनंतर तुफान पाऊस झाला. यामुळे शहरातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे पुढे आले. महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, महामार्ग, पोलिस आदी यंत्रणांचा यात समावेश आहे. पाणी तुंबणे, झाडे पडणे, सीमाभिंत पडणे, वाहतूक नियंत्रण दिवे बंद पडणे, वीजपुरवठा खंडित हाेणे, वाहतूक काेंडीचा सामना बुधवारी (दि. २०) पुणेकरांनी केला.
या वेळी वरील सर्व यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे असताना केवळ पालिकेचे अधिकारी रस्त्यावर होते. पोलिस यंत्रणा नसल्याने जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे इतर यंत्रणांशी तुमचा समन्वय नव्हता का? समन्वयाची जबाबदारी आणि कामे करण्याची जबाबदारी फक्त पालिकेचीच आहे का? असे प्रश्न अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना विचारले असता, आपत्ती निवारण यंत्रणांमधील समन्वय वाढविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे ४६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, कक्षामार्फत पाण्याचा निचरा करणे किंवा झाडे हटवणे आदी मदतकार्यासाठी महानगरपालिकेचे सुमारे साडेसातशे कर्मचारी रस्त्यावर रात्रभर काम करत होते, असे देखील पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.