

कामशेत(पुणे) : गणेशोत्सव जवळ आला असल्यामुळे कामशेत परिसरात ढोल-ताशा वादनाच्या सरावाला वेग आला असून, मंडळांकडून नवनवीन चाली बसविल्या जात आहेत.
ग्रामीण भागात डीजेवर बंदी असल्याने तालुक्यातील ढोल-ताशा पथकांना मागणी वाढली आहे. सुरुवातीला फक्त ग्रामीण भागातच घुमणारा ढोल-ताशांचा आवाज आता शहरी भागातही घुमू लागला आहे. तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, पवन मावळबरोबरच आता पुणे, मुंबई भागात ढोल-ताशा पथकास मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या ढोल पथकांच्या सरावालाही सुरुवात करण्यात आली असून, परिसरात शाळांच्या प्रांगणात किंवा गावच्या मोकळा जागेत ढोल-ताशांची आवाज घुमू लागला आहे.
यावर्षी ढोल-ताशांना लागणारे साहित्य महाग झाल्याने सुपारीमध्येही वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या आगमनापर्यंत ग्रामीण भागातील शेतीतील बहुतांश कामे संपण्याची शक्यता आहे. अशावेळी तरुण, शाळा कॉलेजचे विद्यार्थी ढोल पथकाच्या सरावामध्ये सहभागी होत आहेत. याशिवाय तरुणांना ढोल पथकांच्या सुपारीमधून चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. या पथकाच्या माध्यमातून सामाजिक कार्य ग्रामीण भागामध्ये घडत असताना दिसत आहे. पथकाच्या माध्यमातून गावात मंदिर शाळेसाठी मदतही केली आहे. मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण पाहता राजकीय पक्ष, नेते ढोल पथकाच्या साधनांना आर्थिक मदत करत असल्याचे दिसून येत आहे.
या ढोल पथकाला व्यावसायिक स्वरूप येत असल्यामुळे त्यांच्यामध्येही स्पर्धा निर्माण होत आहे. अनुभवी पथकातील सभासदांसाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली आहे. ढोल पथकांना गणेशोत्सवातील मिरवणूक अथवा इतर कार्यक्रमांत चांगले पैसे मिळत असल्याने या खेळाकडे आता व्यावसायिक दृष्टीने पाहिले जात आहे. ढोलपथकात आता मुलांप्रमाणे मुलीची संख्यादेखील वाढत चालली आहे. महिलादेखील ढोल पथकामध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करताना दिसत आहेत. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.
हेही वाचा