

टाकवे बुद्रुक(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांपासून आंदर मावळ परिसरात पावसाने उघडीप दिल्याने भुईमूग, तूर, वरई, नाचणी यांसारख्या पिकांची खुरपणी करताना शेतकरी दिसून येत आहेत.
यावर्षी पाऊस सतत पडत नसल्याने या पिकांसाठी पाऊस पोषक ठरला आहे. यामुळे पिके तरारलेली दिसून येत आहेत. तसेच, कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव या पिकांवर दिसून येत नाही. यावर्षी पिकांची उगवणूक शंभर टक्के झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. सध्या भुईमूग पिकाची खुरपणी करताना शेतकरी दिसून येत आहेत. तर वरई, नाचणी या पिकांमध्ये बैलांच्या साह्याने आऊत धरल्याचे दिसून येत आहे. पूर्वी भुईमूग, वरई, नाचणी, तूर आदी पिके घेण्यासाठी आंदर मावळ अग्रेसर होता. परंतु, वन्यप्राणी या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत असल्याने तसेच वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकर्यांनी ही पिके घेण्यासाठी दुर्लक्ष केली असल्याचे दिसत आहे.
या पिकांचे प्रमाण कमी प्रमाणात शेतकरी घेत असल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे. वरई, नाचणी ही पिके पाण्याचा निचरा होणार्या ठिकाणी किंवा डोंगर उतारा वरती चांगले उत्पन्न मिळते. परंतु, वरळी, नाचणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे येत असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असल्याचे दिसून येत होते. परंतु, सध्या ही पिके नामशेष होत चालली आहेत. या परिसरात वरई, नाचणी पिकाची लागवड तुरळक दिसून येत आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी कमी प्रमाणात ही पिके घेत आहेत.
यावर्षी मावळातील शेतकर्यांनी इंद्रायणी भाताची लागवड सर्वांधिक केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. या भागातील भात उत्पादक शेतकर्यांनी अंतर्गत मशागतीची कामे सुरू केलेली आहेत.
मावळ हा अती पाऊस असलेला तालुका असून, तालुक्यात खरीप भातपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी सुमारे 13 हजार हेक्टरवर भातपीक घेतले असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कृषी अधिकार्यांनी खरीप भातपिकाबाबत शेतकरीबांधवाना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केल्यामुळे भात लागवडी व्यवस्थितपणे पार पडल्या आहेत.
हेही वाचा