

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा राजकीय लढतीला वेगळाच रंग चढला असून, एकाच घरातील दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्याने नातेवाइकांच्या जोड्यांचा सामना अनेक प्रभागांत पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पती-पत्नी, तर काही ठिकाणी आई-मुलगा, बाप-लेक, भाऊ-भाऊ किंवा सासू-सून अशी अनोखी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय स्पर्धेपुरती न राहता कौटुंबिक प्रतिष्ठेची लढाई बनल्याचे चित्र दिसून येत आहे. तब्बल 20 पेक्षा अधिक जागांवर या लढती होत असल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली. काही ठिकाणी एका कुटुंबातील एका सदस्याला पक्षाची उमेदवारी मिळाली, तर दुसऱ्या सदस्याने अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षातून अर्ज भरत थेट मैदानात उडी घेतली. परिणामी घरातील राजकारण थेट मतपेटीपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांत पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावरून आमनेसामने असल्याने प्रचारादरम्यान घरातील मतभेद उघडपणे रस्त्यावर दिसत आहेत. प्रचाराच्या फेऱ्या, झेंडे, बॅनर आणि सभा यामध्ये एकाच घरातील दोन उमेदवारांची स्पर्धा मतदारांसाठीही कुतूहलाचा विषय ठरत आहे. “घरात कोणाला मत द्यायचे” हा प्रश्न अनेक कुटुंबांत चर्चेचा विषय बनला आहे. या कौटुंबिक लढतींमुळे स्थानिक मुद्द्यांपेक्षा भावनिक समीकरणे अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. मतदार काही ठिकाणी पक्षनिष्ठेपेक्षा ओळखी, नातेसंबंध आणि व्यक्तिगत विश्वासाला प्राधान्य देताना दिसू शकतात. याचा थेट परिणाम निकालांवर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग क्रमांक 22 कासेवाडी-डायस प्लॉटमधून अविनाश बागवे, इंदिरा बागवे हे दाम्पत्य कॉंग््रेासकडून निवडणूक रिंगणात उतरले आहे, तर सनसिटी -माणिकबाग या प्रभागात सर्वसाधारण गटातून भाजपचे सचिन मोरे आणि काँग््रेासचे धनंजय पाटील हे दोघेच उमेदवार आहेत. विमाननगर-लोहगाव प्रभागातून सुरेंद्र पठारे आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या, येरवडा-गांधीनगर आणि पुणे स्थानक जय जवाननगर या प्रभागांतून संजय भासले आणि अश्विनी भोसले हे दाम्पत्य निवडणूक लढवत आहेत. कोरेगाव पार्क-घोरपडी मुंढवा या प्रभागातून सुनील ऊर्फ बंडू गायकवाड हे राष्ट्रवादी काँग््रेास, तर उमेश गायकवाड भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीत हे चुलते-पुतणे वेगवेगळ्या प्रभागांतून आपापल्या पक्षांतून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत हे दोघेही एकमेकांविरोधात लढत आहेत. हिमाली कांबळे (भाजप) आणि सुमन गायकवाड (राष्ट्रवादी काँग््रेास) या नातेवाइकांची जोडीदेखील याच प्रभागातून निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या ऐश्वर्या पाटील-पठारे, तर त्यांचे पती व सर्वात श्रीमंत उमेदवार असलेले सुरेंद्र पठारे हे देखील भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवत आहेत, तर प्रभाग 6 मधून भाजपचे संजय भोसले, तर त्यांच्या पत्नी अश्विनी भोसले देखील भाजपच्या तिकिटावर प्रभाग 13 मधून निवडणूक लढवत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पक्षातून कॉंग््रेासमध्ये गेलेले प्रशांत जगताप व त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप या प्रभाग क्रमांक 18 मधून लढत आहेत, तर प्रभाग क्रमांक 34 मधून राधिका गिरमे, नीलेश गिरमे हे शिवसेनेकडून लढत आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर या प्रभाग क्रमांक 23 मधून, तर त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर हा प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून हरवर्धन मानकर हे राष्ट्रवादी कॉंग््रेासकडून, तर त्यांचे भाऊ राघवेंद्र मानकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक 37 मधून प्रतीक कदम (राकॉं), तर प्रभाग क्रमांक 38 मधून प्रकाश कदम हे बाप-लेक निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 38 मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वसंत मोरे, तर त्यांचा मुलगा रुपेश- मोरे हे प्रभाग क्रमांक 40 मधून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 27 मधून अक्षता गदादे या राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार पक्षाकडून, तर प्रभाग क्रमांक 28 मधून प्रिया गदादे या दोघी नणंद आणि भावजय निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 22 मधून रफिक शेख, दिलशाद शेख, (काँग््रेास) हे मामा- भाचे निवडणूक रिंगणात आहेत.
नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी नाकारल्याचा सूर
दरम्यान, काही पक्षांवर घराणेशाहीला खतपाणी घातल्याचा आरोप होत आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना राजकीय संधी मिळत असताना नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी नाकारली जात असल्याचा सूर उमेदवारांमध्ये उमटू लागला आहे. दुसरीकडे, मात्र “लोकप्रियता आणि कार्यक्षमतेच्या आधारेच उमेदवारी दिली आहे,” असे स्पष्टीकरण पक्षनेतृत्व देत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची ही निवडणूक सत्तापरिवर्तनाबरोबरच कौटुंबिक राजकारणाची कसोटी ठरणार आहे.