पुणे: कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघातानंतर त्यातील अल्पवयीन मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. त्या वेळी न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे खोटी कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करणे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचे बनावटीकरण करण्याबाबतचे कलम त्यांच्यावर लागू होणार नाही, असा युक्तिवाद बुधवारी (ता. 2) बचाव पक्षाकडून करण्यात आला.
पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप या गुन्ह्यात पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. 27) सुरू झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शुक्रवारी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली. आरोप निश्चितीबाबत डॉ. तावरे यांच्यावतीने अॅड. सुधीर शहा यांनी युक्तिवाद केला.(Latest Pune News)
कल्याणीनगरमध्ये 18 मेच्या मध्यरात्री भरधाव पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातात अल्पवयीन मुलगा वाहन चालवत होता. त्याच्याबरोबर दोन अल्पवयीन मित्र होते. अपघातानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससूनमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र, नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याच्यासह इतरांच्या मदतीने नमुने बदलल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांचाही सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पुढील सुनावणी 8 जुलैला
डॉ. तावरे यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचे पुरावे पोलिसांकडे नाहीत. त्यामुळे त्याबाबतचे कलम देखील त्यांना लागू होणार नाही, असा युक्तिवाद अॅड. शहा यांनी केला. इतर आरोपींची बाजू मांडण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांकडून काही दिवसांची मुदत मागण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणावर पुढील सुनावणी आठ जुलैला होणार आहे. दरम्यान, आरोपी अश्पाक मकानदार याने दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे; तर आशिष मित्तल याने कागदपत्रांची मागणी करणारा स्वतंत्र अर्ज न्यायालयात दाखल केला आहे.