

अशोक शेंगाळे
सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे पवित्र स्वयंभू ज्योतिर्लिंग हे प्राचीन काळापासून हेमडपंती शैलीचे मंदिर आहे. येथे शिव-पार्वती हे अर्ध्या भागात वसल्याने अर्धनारीनटेश्वर असेही म्हटले जाते.
मद्यसेवन करणार्या व हुल्लडबाजी करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बॉम्बशोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ व पायर्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, डॉग स्क्वॉड, हँडमेटल डिटेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. (Latest Pune News)
निसर्गसौंदर्याने नटलेला पावसाळ्यातील पोखरी घाट, भीमाशंकर, निगडाळे, आहुपे, कोंढवळ, डिंभे धरण या परिसरातील पोखरी घाटातील धबधबे, दुतर्फा असलेली झाडी, उंचच उंच डोंगर, खळाळणारे ओढे-नाले, हिरवीगार झालेली झाडी, डोंगर उतारावरून कोसळणारे धबधबे तसेच डोंगरी भागात वसलेली छोटी उतरत्या छपरांची घरे असलेल्या गावांमुळे हा परिसर सौंदर्याने नटलेला आहे.
निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. मानवी वर्दळीपासून दूर असलेला हा परिसर निसर्गसौंदर्याने फुलला आहे. त्याचप्रमाणे प्रतिमहाबळेश्वर असलेल्या आहुपे येथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दाट धुक्यात हा परिसर झाकून गेला असून, आभाळ धरतीला टेकल्याचा आभास होत आहे.
हे ठिकाण तीर्थक्षत्राबरोबरच पर्यटनासाठी लोकांना आकर्षित करते. निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. जंगलात प्राणी, पशू-पक्षी, रंगबिरंगी फुलपाखरे आढळतात. याच जंगलात अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. कोकण कडा, अवनस्पती पॉइंट नागफणी, भाकादेवी भटीचेरान, कोथरणे, मंदोशी, पोखरी, डिंभे जलाशय, गोहे जलाशय, कोंढवळ परिसरातील रम्य धबधबे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
भोरगड हे ठिकाण भीमाशंकरलगत जंगलात असून, येथे जुन्या काळातील लेणी आणि मंदिरे आहेत. अभयारण्य देवताच्या मूर्ती आहेत. 130.78 चौरस किमी पसरलेले भोरगड हा एकमेव किल्ला येथे आहे. हे जंगल सदा हरित, गर्द हिरव्या रंगात माखलेले असते. येथील लेण्या झाडीने व्यापलेल्या आहेत.
पावसाळी पर्यटनासाठी अतिशय उत्तम ठिकाण भीमाशंकर आहे. या ठिकाणी असलेल्या सर्वांत उंच अशा नागफणी टोकावर गेल्यावर कड्याच्या तळापर्यंत खेटलेली मुंबईच्या आजूबाजूची गावे, पदरचा किल्ला, तुंगी, कळवंतीचा महाल, माथेरानची पर्वतरांग, घोणेमाळ, सिध्दगड असा परिसर दिसतो. अनेक हौशी पर्यटक कर्जत खांडसमार्गे गणेश घाट, शिडी घाटामार्गे पायीदेखील भीमाशंकरला येतात.
भीमाशंकरला कसे याल?
मुंबई से भीमाशंकर हे अंतर 240 किलोमीटर, तर पुणे-भीमाशंकर हे अंतर 125 किलोमीटर आहे. भीमाशंकरकडे येण्यासाठी मंचर, घोडेगाव, डिंभे, तळेघरमार्गे एक रस्ता आहे. राजगुरुनगर-वाडा आणि तळेघरमार्गे एक रस्ता आहे. काही धाडसी पर्यटक हे शिडी घाटाच्या वाटेने पायी चढून येतात. भीमाशंकरमध्ये येण्यासाठी एकमेव मंचरमार्गे रस्ता असून, पुणे (शिवाजीनगर) आगारातून दर दोन तासांनी एसटी बस उपलब्ध आहेत.