आळंदी: जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ। अंगीं ऐसेबळ रेडा बोले॥1॥
करिल ते काय नव्हे महाराज। परि पाहे बीज शुद्ध अंगी ॥ ध्रु॥
जयाने घातली मुक्तिची गवांदी। मेळविली मांदी वैष्णवाची ॥2॥
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे। राहे समाधान चित्ताचिया ॥3॥
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याचा गौरव करताना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातच माउलींच्या प्रतिभेची श्रीमंती सांगताना, ज्याच्या दरवाजातच सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये साक्षात रेड्यालाही बोलते करण्याची ताकद आहे. त्या माउलींना काय उणे पडू शकते, असे स्पष्ट करतात. (Latest Pune News)
माउलींच्या वैभवात भर घालणारा उपक्रम आळंदी देवस्थानने हाती घेतला आहे. माउलींच्या 750 व्या जन्मवर्षात आणि तेही त्यांच्या जन्मदिनी गोकुळाष्टमीला तब्बल अकरा किलो वजनाचा आणि अंदाजे अकरा कोटी रुपयांचा सोन्याचा कळस माउलींच्या संजीवन समाधी मंदिरावरील शिखरावर बसविण्याचा संकल्प आळंदी देवस्थान, आळंदीकर ग्रामस्थ, भाविक, वारकरी यांनी केला आहे.
या संकल्पाला हातभार लावण्यासाठी आणि या सुवर्णक्षणाचे भागीदार होण्यासाठी भाविकांचा देणगी देण्याचा ओघ वाढला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत देवस्थानच्या तिजोरीत सुवर्णकलशासाठी तब्बल अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत.
देणगी स्वीकारण्यासाठी आणि जमा करण्यासाठी देवस्थान कार्यालयात विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. रोज या ठिकाणी भाविक कळसाच्या कामासाठी लाखो रुपयांची देणगी देत असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. 15 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी दिनी सुवर्णकलशाचे कलशारोहण होणार आहे.
सुवर्णकलश बनवण्याचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर लोंढे, अॅड. राजेंद्र उमाप, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, अॅड. रोहिणी पवार यांनी दिली.