पुण्यात बालगुन्हेगार ग्लॅमरसाठी रेखाटताहेत ‘रक्तचरित्र’

पुण्यात बालगुन्हेगार ग्लॅमरसाठी रेखाटताहेत ‘रक्तचरित्र’
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे : ओठावर मिसरूड न फुटलेली पोरं पूर्ववैमनस्यातून भरदिवसा गावठी कट्ट्यातून बार काढू लागली आहेत, तर कोणी मित्राला नडला म्हणून कोयत्याने सपासप वार करत 'रक्तचरित्र' रेखाटू लागली आहेत.

ग्लॅमरच्या आकर्षणातून अल्पवयीन मुलांच्या डोक्यात भाईगिरीची हवा शिरू पाहते आहे. कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सराईत गुन्हेगारांकडून प्रतिस्पर्ध्यांचा गेम सेट करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये बालगुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दाखल झालेल्या 302 गुन्ह्यांत 415 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर 2019-20 या कालावधीत 417 गुन्हे दाखल आहेत.

शहरातील गुन्हेगारीच्या घटना पाहिल्या, तर खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड अशा गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे दिसते. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीची झालेली हत्या असो, की उत्तमनगर परिसरातील गोळीबार किंवा मागील आठवड्यात हडपसर येथील तरुणाचा झालेला खून. या सर्व घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. त्यामुळे सराईतांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले तरी, वाढती बालगुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

समाज, इतरांचे अनुकरण, ग्लॅमरस जीवन जगण्याचा मोह, आई-वडिलांंशी तुटलेला संवाद किंवा घरातील इतर अनेक गुंतेही बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत ठरतात. घरात, समाजात घडणार्‍या घटनांचे अनुकरण करत असतात. मद्यप्राशन करून आल्यानंतर वडिलांकडून आईवर होणारे अत्याचार, होणारी मारहाण, गुन्हेगारी घटना असली हिंसक दृश्ये रोज पाहत अनेक मुले मोठी होतात. त्यांच्या मनावर या हिंसेचेही विपरित परिणाम होत राहतात. त्यातूनच अनेकजण अनवधानाने गुन्हेगारी मार्गावर जातात.

ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्टमध्ये गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यात सुधारणा करण्यासंदर्भात तरतूद आहे. परंतु त्याचा गैरफायदा समाजविघातक सराइतांकडून चुकींच्या कामासाठी केला जातो आहे. त्यातूनच अशी गुन्हेगारी फोफावताना दिसून येते.

– बाळासाहेब खोपडे, माजी अतिरिक्त सरकारी वकील

बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कारवाईबरोबरच समुपदेशनावर भर दिला जातो आहे. गुन्हे शाखेच्या बालसुरक्षा पथकासह इतर पथकांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे.

– श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news